कलम 370 नव्हे; दुष्काळमुक्त राज्य हा आमचा प्रमुख मुद्दा

मुख्यमंत्री फडणवीस: राष्ट्रवाद आणि विकासावर भाजपचा नेहमीच भर
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कलम 370 हा मुद्दा प्रमुख बनवल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी फेटाळून लावला. कलम 370 नव्हे; तर राज्याला दुष्काळमुक्त आणि 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवणे या प्रमुख मुद्‌द्‌यांवर आम्ही भर दिल्याचा दावा त्यांनी केला.

निवडक पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. कलम 370 हटवले जावे अशी संपूर्ण देशाची इच्छा होती. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेवर असताना ते केले नाही. त्यामुळे आम्ही त्या पक्षांना त्या मुद्‌द्‌यावरून उघडे पाडले. त्या मुद्‌द्‌याला राष्ट्रीय महत्व असल्याने ठळक स्थान मिळाले, अशा शब्दांत तो उपस्थित करणे गैर नसल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवाद आणि विकास हा नेहमीच भाजपचा अजेंडा राहिला आहे. प्रचारमोहिमेवेळी मी राज्य सरकारने केलेली विकासकामे आणि पुढील पाच वर्षांच्या योजनांवर भर दिला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

देशाची अर्थव्यवस्था अयोग्यरित्या हाताळली जात असल्याचा आरोप करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अलिकडेच मोदी सरकारला लक्ष्य केले. त्या अयोग्य हाताळणीचा सर्वांधिक प्रतिकूल परिणाम महाराष्ट्रावर होईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, सिंग अर्थतज्ञ असले तरी त्यांनी केलेले वक्तव्य राजकीय स्वरूपाचे आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची राजवट केंद्रात असताना महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत चौथ्या किंवा पाचव्या स्थानी होता. मात्र, मागील तीन वर्षांपासून आपले राज्य पहिल्या स्थानावर आहे.

देशातील एकूण स्टार्ट-अप्सपैकी 25 टक्के महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण रोजगारनिर्मितीत आपल्या राज्याचा वाटा 25 टक्के इतका आहे, असा दावाही त्यांनी केला. यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्‍वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.