अध्यक्ष डॉ.के.सिवन यांची माहिती; एच. के. फिरोदिया पुरस्काराचे वितरण
पुणे – इस्रोने केवळ अग्निबाणांची निर्मिती केली नसून संदेशवहन, दळणवळण, आपत्ती व्यवस्थापनासाठी उपग्रहांची निर्मिती, प्रक्षेपण केले आहे. तसेच, तमिळनाडूतील कुलासेकरपट्टीनम येथे नवीन प्रक्षेपण स्थळाची बांधणी करण्यात येत आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के.सिवन यांनी दिली.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एच. के. फिरोदिया पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. डॉ. सिवन यांना विज्ञानरत्न आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांना विज्ञानभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी उपस्थित होते.
डॉ. मांडे म्हणाले की, दररोज व्यायाम केल्यास आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली अवलंबिल्यास शरीरात जिवाणूंचा 90 टक्के धोका संभवत नाही. आजारांना समजून घेण्यासाठी पेशी, उती, शरीर, मानवी समूह यांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सामान्य माणसांचे रोजच्या जीवनातील समस्यांचे वैज्ञानिक समाधान शोधण्याचे काम सीएसआयआरच्या माध्यमातून केले जाते. डॉ. माशेलकर यांनी पुढील पुरस्कारार्थी हे महिला वैज्ञानिकच असतील, असे जाहीर केले.
चार अंतराळवीरांचे प्रशिक्षण रशियात…
गगनयान मोहिमेत अंतराळवीर सात दिवस अवकाशात राहणार आहेत. त्यासाठी हवाई दलाकडून निवड करण्यात आलेल्या चार अंतराळवीरांना 15 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात आले आहे. शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणाबरोबरच अवकाशयानाच्या कुपीत राहण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणात असल्याचे, डॉ. सिवन यांनी सांगितले.