स्मरण: साहित्यिक नकोत ; सैनिक हवेत !

माधव विद्वांस

वर्ष 1938 मध्ये मुंबईमध्ये 23 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीविषयी अनेक सिद्धांत मांडले होते. जुलमी ब्रिटिश राजवटीविरोधात लढण्यासाठी साहित्यिक, लेखकांनी बंदुका हातात घेण्याचे आवाहन केले होते. आज 80 वर्षांनंतरही, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर, सावरकरांच्या याच विचारांचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही; तेही उद्याच्या “मराठी भाषा दिना’निमित्ताने!

जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा असलेले, विज्ञानवादी दृष्टीचे, जहाल क्रांतिकारक आणि मराठी भाषेवरील परकीय भाषांचे आक्रमण थोपवण्यासाठी अविरत कार्यरत राहिलेले साहित्यिक, कवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकजवळील भगूर येथे झाला. सावरकर घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यात असलेल्या गुहागर पालशेत येथील होते. सावरकरांचे शिक्षण भगूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे एलएलबीपर्यंत झाले. पुढे त्यांनी लंडनला जाऊन “बॅरिस्टर’ही पदवी घेतली.

वर्ष 1938 मध्ये मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी भाषा शुद्धीबद्दल आग्रही मत मांडले. याच संमेलनात “लेखण्या मोडा, बंदुका घ्या!’ असा संदेशही त्यांनी दिला होता. ते म्हणाले होते की, “राष्ट्रसंरक्षणार्थ सर्वात प्रथम रायफल क्‍लबमध्ये नाव नोंदवा आणि बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण घ्या. नंतर वेळ राहिल्यास रडगाण्यांच्या अथवा रडकथांच्या साहित्य संमेलनात सहभागी व्हा. साहित्यिकांनी साहित्याच्या पोथ्या गुंडाळून सैन्याच्या शिबिराकडे वळले पाहिजे. कारण जे राष्ट्र खुरटे व दुबळे असते, त्या राष्ट्रातील साहित्यिकही तसेच खुरटे, दुबळे राहण्याची शक्‍यता असते.

राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत साहित्याचे सापेक्ष महत्त्व तिय्यम आहे. आजच्या तरुण पिढीचे पहिले कर्तव्य आहे, सैनिकी शिक्षण. पुढील दहा वर्षात सुनीते (कविता) रचणारा एकही तरुण निर्माण नाही झाला तरी चालेल, प्रत्यही साहित्य संमेलने नाही झाली तरी चालतील, पण दहा-दहा हजार तरुण सैनिकांच्या वीर-चमू, आपल्या खांद्यावर नव्यातल्या नव्या रायफली टाकून, राष्ट्राच्या मार्गामार्गांतून, शिबिरा-शिबिरातून, टपटप्‌ करीत, संचलन करताना दिसल्या पाहिजेत.’ आज सावरकर असते तर पुलवामा घटनेबाबत मेणबत्त्या प्रज्वलित करीत निषेध करीत बसण्यापेक्षा लष्कराला व भारतवासीयांना धैर्य देणारे संदेश व गीते त्यांच्या लेखणीतून नक्कीच उतरली असती.
साहित्यिकांना आणि निरुद्योगी तरुणांना अशा कानपिचक्‍या देणाऱ्या सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवे पारिभाषिक शब्दही दिले. एखाद्या निवडणुकीनंतर “कॉंग्रेसचा महापौर झाला’, असे शब्द कानावर पडतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की “महापौर’ हा शब्द सावरकरांनीच घडवलेला आहे.

पुण्याचे तत्कालीन नवनिर्वाचित मेयर गणपतराव नलावडे यांना सावरकरांनी अभिनंदनपर असे एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी अभिनंदन उशिरा केल्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त करताना लिहिले की, “मेयर’ या शब्दाला मराठीत शब्द सुचत नव्हता, म्हणून उशीर झाला व “महापौर’ हा शब्द सुचल्याबरोबर आपणास पत्र लिहीत आहे.’ पत्र वाचताच गणपतरावांनी त्यांच्या कार्यालयातील पाटीवर “मेयर’ या शब्दाच्या जागी “महापौर’ हा शब्द लिहिण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे महापौर शब्दाचा जन्म झाला.

सावरकर कोल्हापूर येथे विनायकराव पेंढारकरांकडे गेले होते. चित्रपटाच्या नामावलीतील इंग्रजी शब्दांचा वापर पाहून सावरकरांनी नाराजी व्यक्‍त केली. पेंढारकरांनी त्यांना प्रतिशब्द सुचविण्याची विनंती केली आणि सावरकरांनी अनेक नवे शब्द तिथल्या तिथे घडवले. स्टुडियो-कलामंदिर, शूटिंग-चित्रीकरण, थिएटर-चित्रपटगृह, फोटोग्राफर-छायाचित्रक, डायरेक्‍टर-दिग्दर्शक, एडिटर-संकलक, रेकोर्डीस्ट-ध्वनिलेखक, असे अनेक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द मिळाले.
सावरकरांच्या पुरोगामीपणाच्या, राष्ट्रीय विचारांच्या बद्दल बरेच लिहिले जाते. पण त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेमाचे व साहित्याचे अवलोकन करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. आज त्यांनीच रूढ केलेले दूरध्वनी, दिनांक, संकलक, चित्रपट असे अनेक शब्द आपण सर्रास वापरतो.

सावरकर संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. अनेक विषयांवर त्यांनी सुमारे 12000 पृष्ठांचे लेखन केले आहे. त्यांच्या लेखनात राष्ट्रप्रेम, मातृभाषाप्रेम प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या बऱ्याच कविता संस्कृत-प्रचूर आहेत. याचा उत्तम नमुना म्हणजे स्वतंत्रतेचे स्तोत्र, संस्कृत आणि मराठीचा सुंदर मिलाफ सावरकरांनी घडविला आहे. त्यांनी समरगीत, पोवाडे, फटके, या प्रकारातील काव्यही केले. वर्ष 1930 मध्ये लिहिलेले त्यांचे “संगीत संन्यस्त खड्‌ग’ हे नाटक त्यांची नाट्यगीत लेखनाची क्षमता प्रतिभा आणि दडलेला नाटककार हे दोनही दाखवून देते. त्यांच्या लेखन आणि काव्यामधे जाज्वल्य इतिहास आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. ते हिंदी राष्ट्रभाषा व्हावी म्हणून आग्रही होते. वर्ष 1904 मध्ये “अभिनव भारत’ ही संस्था स्थापन करून ‘भारत’या शब्दावरील आपले प्रेम त्यांनी दाखवून दिले.

वर्ष 1926 मध्ये स्थानबद्धतेत असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी “मराठी भाषेचे शुद्धीकरण’ नावाची एक पुस्तिका लिहिली. त्या पुस्तिकेच्या शेवटी तिच्या अखेरीस “त्याज्य विदेशी शब्दांचे टाचण’ असा एक स्वकीय शब्द निर्माण केलेला लघुकोश दिला आहे. त्यामधे काही शब्द शिक्षणविषयक, धंदेविषयक, शुद्ध-मुद्रण-टपालविषयक, सभा निर्बंधविषयक, भौगोलिक व चित्रपटविषयक असलेले अनेक शब्द आहेत. सावरकरांच्या स्मृतीला सादर वंदन!

Leave A Reply

Your email address will not be published.