बोधेगाव ग्रामीण रुग्णालय असून नसल्यासारखे

कर्मचाऱ्यांची संख्याही आहे कमी
मशिनरी नसल्याने रुग्णांची हेळसांड
शेवगाव  (प्रतिनिधी) – तालुक्‍याचा पूर्व भाग आजही आरोग्याच्या दृष्टीने मागासलेला आहे. येथील रुग्णसेवा रामभरोसे आहे. पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी ही दोन मोठी गावे आहेत. या परिसरातील 35 गावांत आज एकही नाव घेण्यासारखे मोठे असे अद्ययावत रुग्णालय नाही. आजही येथील अडलेला रुग्ण शेवगाव, नगर किंवा औरंगाबादला हलवावा लागतो. सर्वसामान्यांना आधार असणारे व रुग्णसेवा देणारे ग्रामीण आरोग्य केंद्र येथे असून नसल्यासारखे आहे.

बोधेगाव बालमटाकळीच्या मध्यवर्ती ठिकाणी 2006 मध्ये दोन एकर क्षेत्रात चार कोटी रुपये खर्चाचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात 2011 ला या रुग्णालयाचे काम सुरू झाले. तब्बल पाच वर्षांनी 2016 मध्ये हे काम पूर्ण झाले. मात्र काही तांत्रिक अडचणी आणि तत्कालिन राजकीय स्थित्यंतरामुळे रुग्णालयाचे औपचारीक उद्‌घाटन न होताच त्याचे कामकाज सुरू झाले. मात्र शासन व प्रशासन पातळीवरून ते कायम दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे ते ग्रामीण रुग्णालय कायम सलाईनवरच आहे.

ग्रामीण रुगणालयासाठी एक अधीक्षक डॉक्‍टर, तीन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माण अधिकारी, सहा सिस्टर, 4 कक्ष सेवक, एक एक्‍स-रे टेक्‍निशियन, एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ, एक प्रयोगशाळा सहाय्यक एक नेत्रचिकित्सक, एक कार्यालय सहाय्यक अधिक्षक, 2 क्‍लार्क, एक कार्यालय परिचर, एक रुग्णवाहिका व चालक असा सेवकवर्ग हवा असतो. मात्र या ग्रामीण रुग्णालयात आजही पूर्ण सेवक वर्ग नियुक्त केलेला नाही. आधुनिक सेवा सुविधाही येथे उपलब्ध नाही. शेवगावच्या अधीक्षक डॉक्‍टराकडे येथील अधीक्षक पदाचा पदभार आहे. तीन पैकी एक वैद्यकीय अधिकारी नेमलेले आहेत, मात्र ते आजारी असल्याने दीर्घ रजेवर आहेत. सहापैकी एक सिस्टर वीना परवानगी कित्येक दिवसांपासून रजेवर आहेत. 2 क्‍लार्क व एक कक्ष सेवक नाहीत.येथे एक्‍स-रे मशिनच नाही त्यामुळे एक्‍स-रे टेक्‍निशियन नाही. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध नसल्याने चालकही नाही.

येथे स्त्रीरोगतज्ञ नसल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांच्या बाळांतपणाचे, महिला रूग्णांचे मोठे हाल होतात.
एक्‍स-रे मशीन व आस्थिरोगतज्ञ डॉक्‍टर नसल्याने अपघातप्रसंगी सामान्यांना या रुग्णालायाचा उपयोग होत नाही. सध्या शाळा तपासणीचे काम करणारे, एक बीएएमएस डॉक्‍टर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यभाराचा डोलारा सांभाळत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.