Rahul Gandhi In Sangli – काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सांगली येथे जाऊन काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
यावेळी आयोजित सभेत राहुल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर सडकून टीका केली. चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सांगली येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी फक्त शिवाजी महाराजांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी.
#WATCH | Sangli | On Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse, Congress MP & LoP Lok Sabha, Rahul Gandhi says, “…I give you a guarantee that Kadam ji’s (late Congress minister Patangrao Kadam) statue installed will be here even after 50-70 years….Shivaji Maharaj’s statue… pic.twitter.com/58HRkT3CEF
— ANI (@ANI) September 5, 2024
पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल माफी मागितली होती. ज्याला कंत्राट दिले त्याने भ्रष्टाचार केला म्हणून पंतप्रधान माफी मागत असतील. महाराष्ट्रातील जनतेकडून चोरी केली आहे म्हणून माफी मागत असतील, असे म्हणत शिवाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा उभारण्यात आला मात्र तो पुतळा उभा राहील याची काळजी घेण्यात आली नाही, अशी टीका केली.
राहुल म्हणाले, महान महापुरुष शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला. मात्र भ्रष्टाचार आणि चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्यामुळे तो पुतळा पडला. पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांचीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे.
पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण –
सांगली जिल्ह्यातील दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे राहुल गांधी यांच्या हस्ते आज गुरुवारी अनावरण करण्यात आले. कदम यांनी महाराष्ट्रात अनेक खात्यांमध्ये मंत्रीपदे भूषवली होती. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या कदम यांचा जिल्ह्यातील वांगी येथे पुतळा बसवण्यात आला आहे. राहुल गांधींनी वांगी येथील दिवंगत नेत्याला समर्पित संग्रहालयालाही भेट दिली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहूमहाराज, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाला उपस्थित होते.
देशात जातनिहाय जनगणना करणार –
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि त्यांची इंडिया आघाडी देशात जातनिहाय जनगणना करेल. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेचा बालेकिल्ला असल्याचा दावाही राहुल यांनी केला.