नवी दिल्ली : ऍमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस हे यंदा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले नाहीत. त्यांच्या पहिल्या क्रमाकांवर आता पुन्हा एकदा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची वर्णी लागली आहे.
ऍमेझॉनचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये जेफ बेझॉस यांचे शेअर्समधील उत्पन्नात 7 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी दुपारच्या सत्रामध्ये ऍमेझॉनच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसले. यामुळे जेफ बेझॉस यांची संपत्ती 103.9 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी बिल गेट्स यांची संपत्ती 105.7 अब्ज डॉलर इतकी आहे.
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती या स्थानावर 24 वर्षांपासून असलेले बिल गेट्स गेल्यावर्षी पहिल्यांदा एक स्थान खाली उतरले होते. त्यावेळी जेफ बेझॉस या स्थानावर पोहोचले होते. पण यावेळी पुन्हा एकदा जेफ बेझॉस खाली उतरले. ऍमेझॉनच्या निव्वळ उत्पन्नात तिसऱ्या तिमाहीमध्ये 26 टक्क्यांची घट झाली. 2017 नंतर पहिल्यांदाच ऍमेझॉनच्या नफ्यात घट झाल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.