नवी दिल्ली – देशात सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. गेल्या सहा दिवसांपासून दररोज १४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित सापडत असल्याने या सहा दिवसांत ९२ हजार ५७३ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.
सुरुवातीपासूनच देशातील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट बनलेला महाराष्ट्र अद्यापही कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत देशात अव्वल स्थानावर कायम आहे. महाराष्ट्रानंतर कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत दिल्ली द्वितीय क्रमांकावर असून येथे ७० हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
दिल्लीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज ७० हजारांचा टप्पा पार केल्याने मुंबईला मागे सोडत दिल्ली हे देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेले शहर बनले आहे. दरम्यान आज देशामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 16 हजार 922 बाधितांची भर पडली आहे. विशेष म्हणजे देशभरात जून महिन्याच्या २५ दिवसांमध्ये तब्ब्ल 2 लाख 82 हजार बाधितांची नोंद झाली आहे.