पुणे, – महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २८ हजार ७०० जणांनी अर्ज केले असून गेल्या आठ ते महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. आता विधानसभा निवडणुका संपल्यानंतर प्रशासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असले, तरी आणखी सह महिने त्यात जाण्यची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आधी भरतीत मराठा आरक्षणाचा समावेश करण्याची प्रक्रिया, लोकसभा, विधानसभेची लागलेली आचारसंहिता यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली आहे. महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ७४८ जागांची भरती केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. त्यातच सातत्याने होत असलेली महापालिकेची हद्दवाढ आणि सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचारी संख्या पाहता महापालिकेस आणखी कनिष्ठ अभियंत्याची गरज आहे. त्यामुळे पालिकेने १३५ जागा भरल्या. त्यानंतर ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली.
पुन्हा आचारसंहितेची शक्यता
ही भरती प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यात आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचा फटका उमेदवारांना बसला आहे. आता ही प्रक्रिया पार पडेल अशी शक्यता आहे. पण, दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही भरती पुन्हा एकदा आचारसंहितेत अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.