उजनीच्या मूळ पाणीवाटपातील थेंबभरही पाणी इंदापूरला जाणार नाही

सोलापूर  – उजनीच्या मूळ पाणीवाटपाला धक्का न लावता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येणारे सांडपाणी इंदापूर तालुक्‍याला दिले जाणार आहे. असे स्पष्टीकरण खडकवासला पाटबंधारे विभागाने परिपत्रकाद्वारे केले आहे.

उजनीच्या पाण्याचा फायदा इंदापूर तालुक्‍यातील जवळपास 16 हजार हेक्‍टर क्षेत्राला होणार आहे. इंदापूर तालुक्‍याला उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी मिळणार असल्याने उजनीच्या पाणीवाटपामध्ये फेरबदल करण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली होती. सोलापूरचे पाणी पळविल्याचा आरोप होऊन काही संघटनांनी आंदोलने सुरू केली होती. उजनीच्या मूळ पाणीवाटपाच्या नियोजनाला धक्का न लावता इंदापूर तालुक्‍याला पाणी देण्यात येणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

उजनी धरणाची एकूण पाणीसाठा 117 टीएमसी इतका आहे. मृत साठा 63.66 टीएमसी इतका आहे. वापराचा पाणीसाठा 53.57 टीएमसी आहे. उजनी प्रकल्प व त्यावरील सर्व उपसा सिंचन पाणीपुरवठा व औद्योगिक पाणी वापर असे एकूण 84.34 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यामुळे मूळ नियोजनावर कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आला नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यासाठी प्रस्तावित असलेल्या शेटफळगढे उपसा सिंचन योजनेसाठी उजनी जलाशयाच्या प्रकल्पीय पाणी वापरामध्ये कोणताही बदल करणे प्रस्तावित नाही.

उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या पुणे महानगरपालिका व पिंपरी चिचवड महानगरपालिका तसेच काही खासगी संस्था व इतर उद्योग सोडलेल्या सांडपाण्यापैकीच 5 टीएमसी पाणी हे उपसा करून खडकवासला कालव्यात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उजनीच्या मूळ नियोजनामध्ये कोणताही बदल न करता अवर्षणग्रस्त असलेल्या इंदापूर तालुक्‍याला सांडपाणी मिळणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर होणारे आरोप निराधार ठरले आहेत.

पालकमंत्र्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष
इंदापूर तालुक्‍यासाठी उजनी धरणातून पाणी पळवण्याचा आरोप पालकमंत्री भरणे यांच्यावर सातत्याने झाला. स्वपक्षीय नेत्यांनीदेखील त्यांच्यावर आरोप केले. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी पाणीवाटप झालेले आहे. त्यामुळे सोलापूरच्या वाट्याचे पाणी इंदापूरला तालुक्‍याला नेले जाणार नाही. तसे झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ. असे विधान वारंवार पालकमंत्री भरणे यांनी केले. त्याकडे राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष करीत सातत्याने पालकमंत्र्यांवर आरोप करणेच पसंत केले. खडकवासला पाटबंधारे विभागाने याबाबत परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे ठरले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.