पुणे – आजारी व्यक्तीची प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि शरीराने साथ दिली तर वय कितीही असो, तो करोनाच्या आजारातून बरा होतो, हे ससून रुग्णालयात 21 दिवस उपचार घेऊन ठणठणीत बरे झालेल्या 59 वर्षीय महिलेने दाखवून दिले. त्यांना ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारामुळे जीवनदान मिळाले. अशाप्रकारे विकार असलेल्या 11 जणांना डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून मरणाच्या दारातून बाहेर काढले. गुरुवारी या व्यक्ती बरे होवून घरी जात असताना डॉक्टरांचे तोंडभरून तर काहींनी आनंदी अश्रूंनी कृतज्ञता व्यक्त केली.
ससून रुग्णालय म्हटल्यावर करोनाने मृत्यूचे तांडव घातलेले रुग्णालय अशीच चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, यातील काही मृत्यू हे उपचाराआधीच झाले असून, अन्य व्यक्तींना जुने वेगवेगळे आजार होते. असा परिस्थितीतही ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हार मानली नाही. “आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, कितीही अत्यावस्थेत आलेल्या रुग्णाला तत्काळ उपचार देऊन त्याला बरे कसे करता येईल त्यांची धडपड सुरू असते.’ या धडपडीतूनच ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यावस्थ, वयोवृद्ध आणि जुने आजार असलेल्या 11 जणांना उपचार देऊन बरे केले.
पर्वती दर्शन येथे राहणाऱ्या या 59 वर्षीय महिलेला 11 एप्रिल रोजी श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना ससूनमध्ये हलवले. त्यांना मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचा जुना आजार आणि करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना वाचविणे डॉक्टरांसमोर मोठे आवाहन होते. करोनाचा रुग्ण 14 दिवसांत बरा होतो. मात्र, यांची प्रकृती अत्यावस्थ असल्यामुळे तब्बल 14 दिवस त्यांना हाय फ्लो ऑक्सिजन नाकाद्वारे देण्यात आला. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली. त्यांची बुधवारी करोना तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली, त्यामुळे त्यांना घरी सोडले.
तसेच कोंढवा परिसरातील 75 वर्षीय व्यक्तीलाही मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, फुप्फुसाचा जुना आजार आहे. त्यांनाही खासगी रुग्णालयातून ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ 45 टक्के होती. अशा परिस्थितीत त्यांना हाय फ्लो ऑक्सिजन दिला असून, गुरुवारी त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
ससूनमधील पहिली करोना पॉझिटिव्ह मातेचा रिपोर्ट निगेटिव्ह
खडकी बाजार येथील गर्भवती महिलेला नवव्या महिन्यांत सर्दी, ताप, खोकला आणि घशाचा त्रास सुरू झाल्यामुळे 16 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल केले. तिचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर शस्त्रक्रिया करून तिची प्रसूती केली. तिच्या बाळाची करोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आई आणि बाळाला स्वतंत्र कक्षात ठेवले होते. काही दिवसांनी बाळाला वडिलांबरोबर घरी सोडले. मात्र, आई रुग्णालयातच. गुरुवारी 14 दिवसांनंतर त्या आईची पुन्हा करोना तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली.