थाळ्या वाजवायला सांगत नाही, तर ‘शिवभोजन’मधून भरलेली थाळी देतोय : उद्धव ठाकरे

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाली. पहिले दोन दिवस विरोधीपक्षाच्या नेत्यांनी गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा हाती घेत विरोधकांच्या भाषणांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी करोना काळात राज्य सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच राज्यात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेवर केलेल्या टीकेला उत्तर दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभोजन थाळीवरून सरकारवर टीका केली होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटले होते की, केंद्र सरकारने करोना काळात ८ महिने ८० कोटी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून अतिरिक्त ५ किलो धान्य दिले. ८ महिन्यानंतर हे सर्व गरीब श्रीमंत झाले का ? ते आत्मनिर्भर झाले का ? त्यामुळे इंधन दरवाढ झाली तरी चालणार का ? असे प्रश्न उपस्थित करत गरीबांना जेवण शिजवता आलं पाहिजे, एवढं तरी करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

सुधीरभाऊ, आम्ही पाच रुपयांत शिवभोजन थाळी देतोय. पोट भरण्यासाठी भरलेली थाळी देतोय. किमान गरीबांना रिकामी थाळी वाजवायला सांगत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात भरलेली थाळी आणि रिकामी थाळी एवढा मोठा फरक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.