गांधी कुटुंबाच्या विरोधात नाही- सिब्बल

नवी दिल्ली – बिहार निवडणुकीत राजद आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वातील महागठबंधनचा पराभव झाला. यात कॉंग्रेसचा पराभव चांगलाच मानहानिकारक होता. यावर केवळ इतर पक्षांनीच नाही तर अगदी कॉंग्रेसमधील नेत्यांनीही टीका केली.

यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आघाडीवर आहेत. त्यांनी कॉंग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यावर कॉंग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. आता सिब्बल यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

याबाबत भाष्य करताना कपिल सिब्बल म्हणाले, कॉंग्रेसच्या प्रमुखपदाबाबत बोलताना राहुल गांधी यांनी दीड वर्षांपूर्वीच आपण कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार नाही असं सांगितलं होतं. तसेच त्यांनी या पदावर गांधी कुटुंबातील कुणीही बसू नये असंही सांगितलं. या मोठ्या कालावधीत कोणताही राष्ट्रीय पक्ष आपल्या अध्यक्षपदाशिवाय कसं राहू शकतो? मी पक्षांतर्गत आवाज उठवला होता.

आम्ही ऑगस्टमध्ये याबाबत पक्षश्रेष्ठींना पत्रही लिहिलं. मात्र, कुणीही आमच्याशी चर्चा केली नाही. दीड वर्षांपासून कॉंग्रेसला अध्यक्ष का नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. कार्यकर्ते आपली अडचण घेऊन कुणाकडे जाणार आहेत?

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, एका राष्ट्रीय पक्षासाठी आणि तेही जेव्हा हा पक्ष सर्वात जुना असेल तेव्हा ही अशी परिस्थिती पक्षासाठी कठीण आहे. मला कुणाच्याही क्षमतांवर प्रश्न उपस्थित करायचे नाही.

पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी असं मी म्हणत आहे. जर आपण आपल्या पक्षातच निवडणूक घेतली नाही, तर आपल्याला हवा तो निकाल कसा येणार? हीच गोष्ट आम्ही आमच्या चिट्ठीत लिहिली होती.

गांधी कुटुंबाच्या विरोधात जाण्याच्या प्रश्नावर बोलताना सिब्बल म्हणाले, मी कॉंग्रेस मुख्य कार्यकारणीचा सदस्य नसल्याने मी पक्षाच्या मंचावर माझं म्हणणं कसं मांडू? त्या पक्षाला अध्यक्ष नाही. आम्ही ऑगस्ट 2020 मध्ये पत्र लिहिलं होतं आणि ते आमचं तिसरं पत्र होतं. याआधी गुलाम नबी आझाद यांनी 2 चिट्ठ्या लिहिल्या होत्या. त्यामुळे मला जेव्हा बोलण्याची संधी मिळाली तेव्हा यावर भाष्य केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.