छत्रपती संभाजीनगर : राज्यात प्रत्येक गावोगावी बेरोजगारी वाढत चालली आहे. दोन वर्षात एक सुद्धा नवीन नोकरी निर्माण झाली नाही. मागील दोन वर्षात एकही मोठा उद्योग आला नाही. महाराष्ट्रात येणारे उद्योग दुसऱ्या राज्यात गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना बेरोजगार युवकांची नोकरी गेली असल्याने लाज वाटायला हवी, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बेरोजगारांना प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची आज जिल्ह्यातील कन्नड विधानसभेतील ठाकरे पक्षाचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्यासाठी जाहीर सभा झाली.
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार अडीच वर्षांत फक्त खाण्याचे काम करत असून 23 नोव्हेंबर रोजी त्यांना हद्दपार करायचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष चोरण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यात अनेक ठिकाणी मी गेलो असलो तरीही प्रचार सभेची सुरुवात आज संभाजीनगर येथून करत आहे, असे सांगत त्यांनी शिवसेना आणि संभाजीनगरचे नाते आधोरेखित केले.
आमचे महाविकास आघाडीचे सरकार चांगले चालू होते, पण भाजपाला वाटले आपण 5 वर्ष विरोधात राहू शकत नाही, म्हणुन पाडून टाकले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या हातातील संविधानाच्या रंगावरुन त्यांना शहरी नक्षलींचा पाठिंबा आहे अशी टीका केली. त्यावरुन आदित्य ठाकरे म्हणाले की, सामान्य नागरिकांना माओवादी आणि शहरी नक्षल म्हणणाऱ्या भाजपला हद्दपार करायचे आहे.