सेऊल – अमेरिकेने उत्तर कोरियाचे एक मालवाहू जहाज जप्त केले आहे. त्यांच्यावर सध्या जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्याचा भंग केल्याच्या कारणावरून हे जहाज जप्त करण्यात आले आहे. हे जहाज परत करावे अशी मागणी त्यांनी आज अमेरिकेकडे केली आहे. अमेरिकेची ही कारवाई म्हणजे दरोडेखोरी आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. गेल्या शुक्रवारी अमेरिकेने हे जहाज जप्त केले होते.
दुसऱ्याच कंपनीचा व देशाचा ध्वज लाऊन हे जहाज समुद्रमार्गाने नेले जात असताना अमेरिकेच्या नौदलाने ते पकडले होते. उत्तर कोरियाजवळील सागरी किनाऱ्यावर अमेरिकन जहाजांची मोठी गस्त असून त्या देशातून येणारी व त्या देशाला जाणाऱ्या जहाजांवर त्यांचे कडक लक्ष आहे. त्यामुळे उत्तर कोरियाची मोठी आर्थिक कोंडी सध्या होत आहे.
अमेरिकेने केलेली ही कृती म्हणजे ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात सिंगापुर येथे झालेल्या कराराचा भंग आहे अशी प्रतिक्रीया उत्तर कोरियाने दिली आहे. त्यांनी आमचे जहाज जप्त करून दरोडेखोरी केली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्यावर दबाव आणून आम्हाला गुडघ्यावर टेकवायचा त्यांचा प्रयत्न आहे असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे. अमेरिकेची ही कृती एखाद्या गुंडाच्या टोळीसारखी आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संयुक्तराष्ट्रांकडे दाद मागण्याचा निर्धार उत्तर कोरियाने केला आहे.