North Korea – उत्तर कोरियाने (North Korea) पुन्हा एकदा आपला हेरगिरीचा उपग्रह प्रक्षेपित (launch spy satellite) करण्याचे ठरवले आहे. बुधवारपासून 30 नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीमध्ये हा लष्करी हेरगिरीचा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. असे उत्तर कोरियाने जपानला कळवले आहे. (launch spy satellite)
लष्करी हेरगिरीचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची उत्तर कोरियाची ही तिसरी वेळ असणार आहे. यापूर्वी असा उपग्रह प्रक्षेपित करण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी होऊन गेले आहेत. त्यामुले आता तिसऱ्यांदा हा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उत्तर कोरियाकडून अशाप्रकारे लष्करी हेरगिरीचा उपग्रह प्रक्षेपित करण्याला शेजारच्या अनेक देशांकडून जोरदार आक्षेप घेतला गेला आहे. मात्र या आक्षेपांना न जुमानता उत्तर कोरियाकडून उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे.
यापूर्वी दोन वेळा ज्याप्रमाणे उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी झाले, तसे झाले तर उप्रह आणि रॉकेटचे अवशेष अवकाशातून पडल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून तीन सागरी मागांवर वाहतूक सुरू न ठेवण्याची सूचना उत्तर कोरियाने जपानला केली आहे.
यापैकी दोन मार्ग कोरिया द्विपसमुह आणि चीन दरम्यानचे आहेत. तर एक मार्ग फिलीपाईन्स समुद्रातील आहे, असे जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले. मे आणि ऑगस्टमध्ये प्रक्षेपण अपयशी झाल्यानंतर रॉकेटचे अवशेष याच सागरी मार्गांमध्ये कोसळले होते.
उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर कोणत्याही उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यावर बंदी घातली आहे. मात्र आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला हेरगीरीच्या उपग्रहाची आवश्यकता असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.
दक्षिण कोरियानं दिला आहे इशारा
उत्तर कोरियाने आपल्या हेरगिरी उपग्रहाचे प्रक्षेपण रद्द करावे, असा इशारा दक्षिण कोरियाच्यावतीने कालच उत्तर कोरियाला देण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया दरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी 2018 मध्ये एक करार केला गेला आहे.
जर उत्तर कोरियाने टेहळणी उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यास हा करार रद्द केला जाईल आणि हवाई टेहळणी पुन्हा सुरू केली जाईल आणि कोरिया द्विपसमूहामध्ये सशस्त्र युद्धसराव आयोजित केला जाईल, असेही दक्षिण कोरियाने म्हटले आहे.