सेऊल – उत्तर कोरियाने आज हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. अण्वस्त्रसज्जतेच्या मुद्द्यावरून दक्षिण कोरिया आणि अमेरिकेबरोबर सुरू असलेली उत्तर कोरियाची चर्चा सध्या थंडावली आहे.
त्यामुळे अमेरिका आणि दक्षिण कोरियावर दबाव टाकण्यासाठी उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी सकाळी करण्यात आलेली ही चाचणी या महिन्यातील तिसरी चाचणी होती. अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर संयुक्त लष्करी सराव कायमस्वरुपी बंद करावा आणि आपली संरक्षण सामुग्री तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी उत्तर कोरियाच्यावतीने संयुक्त राष्ट्रांत केली गेली होती.
त्यानंतर लगेचच ही चाचणी केली गेली. उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसिद्धी माध्यमांनी या क्षेपणास्त्र चाचणीचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे. या क्षेपणास्त्राने आपले सर्व निकष पूर्ण केले असल्याचेही उत्तर कोरियाच्या माध्यमांनी म्हटले आहे. आज चाचणी झालेले क्षेपणास्त्र अप्रगत अवस्थेतील आहे.
अधिक सुधारीत क्षेपणास्त्र तैनात करण्यापूर्वी उत्तर कोरियाला आणखीन थोडा काळ लागू शकतो, असे दक्षिण कोरियाच्या लष्कर प्रमुखानी म्हटले आहे. उत्तर कोरियाने अलिकडेच दक्षिण कोरियाबरोबरचे संबंध सुधारण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेने घातलेले निर्बंध उठवण्याची मागणी उत्तर कोरियाने फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. तेंव्हापासून अण्वस्त्रांबाबतच्या वाटाघाटी थांबल्या आहेत.