सेऊल – उत्तर कोरियाकडून अंतराळात हेरगिरीचा उपग्रह सोडण्याचा पहिलाच प्रयत्न अपयशी झाला आहे. यामुळे आपले लष्करी सामर्थ्य प्रचंड वाढवण्याच्या अध्यक्ष किम जोंग उन यांच्या महत्वाकांक्षेला मोठा हादरा बसला आहे. उत्तर कोरियाचे अमेरिका आणि दक्षिण कोरियाबरोबरचे संबंध सध्या खूप ताणले गेले आहेत. या रॉकेटच्या प्रक्षेपणामध्ये काय त्रुटी राहिल्या हे जाणून घेतल्यानंतर लवकरात लवकर लगेच दुसऱ्यांदा हा टेहळणी उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी उत्तर कोरियाने केली आहे.
उत्तर कोरियाने हेरगिरीच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणे हे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन मानले जाते आहे. सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियाला बॅलिस्टिक तंत्रज्ञानाच्या आधारे कोणतेही प्रक्षेपण करण्यास बंदी घातली आहे. तरिही हे प्रक्षेपण करण्याचे धाडस उत्तर कोरियाने दाखवले आहे.
चोलिमा-1 रॉकेटच्या माध्यमातून मालिग्योंग-1 हा हेरगिरीचा उपग्रह अवकाशात सोडला जाणार होता. उत्तर कोरियाच्या वायव्येकडील सोहाय सॅटेलाईट लॉंच ग्राऊंड येथून सकाळी 6.37 मिनिटांनी हे प्रक्षेपण केले गेले. रॉकेटपासून उपग्रह वेगळा होण्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर हा उपग्रह कोरियाच्या द्विपसमुहाच्या पश्चिमेकडील बेटाजवळ समुद्रात कोसळला, असे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दक्षिण कोरिया, जपानकडून सावधगिरीच्या सूचना…
उत्तर कोरियाचे हे उपग्रह प्रक्षेपण घातक असण्याच्या शक्यतेने दक्षिण कोरिया आणि जपानने आपल्या नागरिकांना अल्पकाळासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सुचना केली होती. उत्तर कोरियाच्या नेहमीच्या क्षेपणास्त्र चाचण्यांप्रमाणेच ही चाचणी असावी असा अंदाज होता. ही चाचणी अण्वस्त्रवाहून नेउ शकणाऱ्याक्षेपणास्त्राची असल्याचा अंदाज दक्षिण कोरियाकडून व्यक्त केला गेला.
सेऊल मधील नागरिकांना मोबाईलवर “एसएमएस’च्या माध्यमातून सकाळी 6 वाजता सुरक्षितठिकाणी आश्रय घेण्याची सूचना केली गेली होती. मात्र दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील एओचेंगदो बेटापासून 200 किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये रॉकेटचे काही अवशेष पडल्याचे आढळून आले. हे अवशेष रॉकेटचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वकाही सुरक्षित असल्याचा “एसएमएस’ नागरिकांना पाठवण्यात आला. असाच मेसेज जपानमधील ओकिनावा येथील रहिवाशांनाही पाठवून सतर्क करण्यात आले होते.