सेऊल – उत्तर कोरियाने आज पुन्हा दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचा संशय दक्षिण कोरियाने व्यक्त केला आहे. या वर्षभरात उत्तर कोरियाने सहाव्यांदा अशाप्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे.
उत्तर कोरियाने घेतलेल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता मध्यम पल्ल्यांची असल्याचा दक्षिण कोरियाचा अंदाज आहे.
पूर्व किनारपट्टीवरून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रांनी 190 किलोमीटर वेगाने 20 किलोमीटर दूर समुद्रातील लक्ष्य गाठले.
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनीही उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे कोणत्याही नौकांचे जहाजांचे नुकसान झाले असल्याचे म्हटलेले नाही.
अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटीदरम्यान बायडेन प्रशासनावर दबाव आणण्यासाठी उत्तर कोरिया वेगाने नवनवीन क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेत आहे. अमेरिकेने घेतलेले निर्बंध शिथिल केले जावेत यासाठी उत्तर कोरिया हे दबावतंत्र अवलंबत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे उत्तर कोरियावर आगोदरच काही ताण आलेला आहे. उत्तर कोरियाचे अर्थकारण अनेक दशकांपासून अत्यंत बेजबाबदार पद्धतीने हाताळले गेले आहे. त्यातच करोनाच्या साथीमुळे उत्तर कोरियाचे अर्थकारण अधिकच अडचणीत आले आहे.