उत्तर कोरियात भीषण अन्न संकटाचे सावट; उद्‌भवू शकते भुकबळीची स्थिती

सेऊल – उत्तर कोरिया देशावर सध्या भीषण अन्न संकटाचे सावट निर्माण झाले आहे. आधीच हा देश जागतिक निर्बंधांमुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असताना आता त्यांच्या देशात हे संकट निर्माण झाल्याने तेथे कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

तेथील हुकुमशाही राजवटीचे प्रमुख किम जोंग यांनीही या अन्न संकटाची आपल्या देशातील जनतेला जाणिव करून दिली असून या संकटासाठी तयार राहण्याची सूचना जनतेला केली आहे.

मधल्या काळात कोविडमुळे संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प झाले होते त्यामुळे उत्तर कोरियाच्या चीन मधील व्यापारालाहीं निर्बंध आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात आलेला उत्तर कोरिया आता पुरता संकटात सापडला आहे. काही तज्ज्ञांच्या मते त्या देशाला या वर्षी किमान एक दशलक्ष टन अन्नाची कमतरता भासू शकते. त्यामुळे त्या देशात भुकबळीचीही स्थिती उद्‌भवू शकते असे सांगण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीने देशातील कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न हाती घेण्याची गरज व्यक्‍त केली आहे. उत्तर कोरियात अजूनही कोविडचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे तेथील गाळात रुतलेले अर्थचक्र इतक्‍यात वेगवान होण्याची शक्‍यता नाही.

उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने जगाचे आवाहन धुडकाऊन आपला अणु कार्यक्रम सुरू ठेवल्याने संपुर्ण जगाचे त्यांच्यावर निर्बंध आहेत. त्या देशाला चर्चेसाठी राजी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने अनेक वेळा केला पण अजूनही त्या देशाच्या ताठर बाणा कायम आहे. त्याची मोठी किंमत त्या देशातील जनता भोगत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.