जोहान्सबर्ग – आयपीएल स्पर्धा पार पडल्यावर दक्षिण आफ्रिका संघ भारतात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल होत आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने संघ जाहीर केला असून त्यात मोठ्या कालावधीनंतर अनरीच नोर्जे व वेन पार्नेल या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी संघात पुनरागमन केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत असून या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेद्वारे यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने त्यांना चांगला सराव मिळणार आहे. येत्या 9 ते 19 जून या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत टी-20 स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणारा ट्रिस्टन स्टब्स या नवोदित फलंदाजाचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका संघ ः टेम्बा बवुमा (कर्णधार), क्वांटन डीकॉक, रीज़ा हेंड्रिक्स, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हीड मिलर, लुंगी एन्जीडी, अनरिच नोर्जे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, मार्को जेन्सन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॉसी वॅन दर दुसेन.