नवी दिल्ली : महाठक सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आपल्या विरोधात विधाने केल्याबद्दल अभिनेत्री नोरा फतेहीने सहकारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात दावा दाखल केला आहे. जॅकलीनने तिच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्यांना ठळक प्रसिध्दी दिल्याबद्दल नोराने 15 माध्यमांच्या विरोधातही दावा दाखल केला आहे. माध्यमांनी जॅकलीनशी संगनमत करून आपल्या विरोधातील बदनामीकारक विधानांना प्रसिध्दी दिली असे नोराचे म्हणणे आहे.
नोराने आपल्या वकिलाच्या माध्यमातून याबाबतची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. आपले करिअर वेगाने पुढे जात असल्यामुळे प्रतिस्पर्धी अभिनेत्रीला (जॅकलीन) असुरक्षितता वाटू लागल्यामुळे निकोप स्पर्धा करण्याऐवजी बदनामीचे कारस्थान रचले गेल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे माझ्या आशिलाची प्रतिमा डागाळेल आणि नाव खराब झाल्यावर काम मिळण्यास अडचण निर्माण होईल व त्यातून आपल्याला संधी मिळेल याच हेतूने हे सगळे केले गेल्याचे नोराच्या वकिलांनी म्हटले आहे.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीनचेही नाव आरोपी म्हणून आहे. तिची यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे. जॅकलीनला सुकेशने अनेक भेटवस्तू दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याचप्रमाणे नोरालाही भेटवस्तू दिल्या गेल्याची कथित माहिती आल्यानंतर नोराचीही चौकशी करण्यात आली होती.
त्या अनुशंगाने जॅकलीनने नोराच्या संदर्भात जी विधाने केली होती त्यांना माध्यमांनी प्रसिध्द दिली होती. त्याबाबत हा दावा नोराने दाखल केला आहे. सुकेशकडून नोरासह अन्य सेलिब्रिटींनाही गिफ्ट मिळाले. मात्र तिला साक्षीदार करण्यात आले आहे, तर मला मात्र आरोपी म्हणून ओढले जाते आहे, असे जॅकलीन म्हणाली होती.