हॉटेलवाल्यांनी नदीचा केला उकिरडा
औंध – स्वच्छ सर्वेक्षणामुळे संपूर्ण पुणे परिसरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जात असतानाच बोपोडी येथे मात्र हॅरिस ब्रीज परिसरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरासह नदीपात्रात शेजारील हॉटेल चालक हॉटेलमधील शिल्लक राहिलेले अन्न तसेच मांसाहारी पदार्थ आणून टाकत असल्यामुळे या पूर्ण परिसरामध्ये घाणीचे तसेच दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यातून बोपोडीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हॅरिस ब्रीज शेजारील नदी पात्रालगत किनाऱ्यावर कचरा तसेच हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेले मांसाहारी पदार्थ, मांसाहारी पदार्थातील हाडे तसेच अंड्यांची टरफले सारखे टाकाऊ पदार्थ उघड्यावरच टाकले जात असल्यामुळे याठिकाणी मोठी दुर्गंधी पसरत आहे. हे खाद्य पदार्थ कुजत असल्याने या ठिकाणी सातत्याने दुर्गंधी सुटलेली असते. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नदीपात्रातील पुल बांधताना येथे टाकण्यात आलेला राडारोडाही तसाच पडून आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. या परिसराची स्वच्छता करावी तसेच त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, असे निवेदन भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रोहित भिसे यांनी सहायक आयुक्त संदीप कदम यांना दिले. यावेळी सुप्रिम चोंधे, दिपेश पिल्ले, अनिकेत भिसे, जयश संगेलिया, यासिन शेख, स्वयम जाधव, गुरू भिसे आदी उपस्थित होते.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा