नवीन दरांनुसार विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर 741 रुपयांवर पोहोचले
दरवाढीने बजेट कोलमडले : जानेवारीपासून सिलिंडर दरात चढ-उतार
पुणे – जुलैपासून सुरू असलेली घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ डिसेंबरमध्येही थांबलेली नाही. दि.1 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर 741 रुपयांवर पोहोचले आहे. मागील महिन्याच्या तुलनेत 14.5 रुपयांनी ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
जानेवारीपासून सातत्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात चढ-उतार दिसून आले. डिसेंबर 2018 मध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 861.87 रुपये होते. त्यानंतर ते घटून जानेवारी 2019 मध्ये 738.45 रुपये झाले. फेब्रुवारीतही दर कमी होण्याचा क्रम सुरू होता. मात्र, अचानकपणे मार्चमध्ये दरवाढ झाली. तब्बल 42 रुपये 50 पैशांची वाढ होत मार्चमध्ये सिलिंडरचे दर 747.50 रुपयांवर गेले.
दरवाढीचा चढता क्रम एप्रिलमध्येही सुरू होता. एप्रिलमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 752.83 रुपये तर, अनुदानितचे दर 505.04 रुपये इतका होता. मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचा विचार करता सिलिंडरच्या दरामध्ये एकूण 47 रुपयांची वाढ झाली होती. जूनमध्येही दरवाढ कायम होती. जूनमध्ये झालेल्या दरवाढीनुसार विनाअनुदानित गॅस सिलिंडर 783.50 तर, अनुदानितचे दर 506.23 रुपये होते.
दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाले. त्यानंतर अपेक्षेनुसार जुलैमध्ये दरकपात दिसून आली. 100 रुपयांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर कमी झाले. त्यामुळे जुलैमध्ये 684 रुपयांना विनाअनुदानित गॅस सिलिंडर उपलब्ध झाले. ऑगस्टमध्ये 621, सप्टेंबरमध्ये 637.50 तर, ऑक्टोबर महिन्यात 650 रुपये दर होते. यामध्ये आता 76 रुपयांनी वाढ झाल्याने हा आकडा 726 रुपयांवर पोहोचला आहे.