कोल्हापूर – ज्या कोव्हिड केअर सेंटर्समध्ये सद्या कोरोना रुग्ण नाहीत, अशी सेंटर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आरोग्य व्यवस्थेतील आरोग्य यंत्रणांच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा आरोग्य व्यवस्थेतील आरोग्य यंत्रणांच्या समन्वयासाठी महापालिकेत बैठक संपन्न् झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, महापालिका उप-आयुक्त निखिल मोरे, राजर्षि शाहु छत्रपती महाराज वैद्यकीय महाविद्यायाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महापालिकचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होत.
कोरोना रुग्णांअभावी रिकामी असलेली कोव्हिड केअर सेंटर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करतांना त्या ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन पाईनलाईन त्याच ठिकाणी सुस्थितीत ठेवाव्यात, दुदैवाने कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा विनियोग करणे सोईचे होणार आहे. याबरोबरच शासनाकडून जिल्हयासाठी प्राप्त होणारे आरटीपीसीआर आणि ॲन्टीजेन कीट शासनस्तरावरुन जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्राप्त करुन घेण्याची सूचना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. तसेच सीपीआर हॉस्पिटल 50 टक्के नॉन कोव्हिड रुग्णांसाठी सुरु करण्याची सूचनाही या बैठकीत करण्यात आली.
कोरोनामुळे होणारे मृत्यूदर हा शुन्य करण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करणे गरजेचे असून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगमुळे हायरिस्क, व्याधीग्रस्त आणी संशयीतांची तपासणी होऊन निदान लवकर होऊन कोरोनाला रोखणे शक्य होईल, असेही आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. सद्या कोराना बाधितांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, साबनाने वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यांवर न थुंकणे यासह अन्य कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणेही गरजेचे असल्याचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले.