Imran Khan – पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि अन्य ९४ जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. यामध्ये त्यांची पत्नी बुशरा बिबी आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंदापूर यांचाही समावेश आहे. इम्रान खान यांनी १३ नोव्हेंबरला पाक सरकारविरोधात निर्वाणीचा लढा देण्यासाठी जनतेला आंदोलनाचे आवाहन केले होते.
दिनांक २४ नोव्हेंबरला इस्लामाबादच्या डी-चौकात धरणे आंदोलनासाठी आलेल्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून हुसकावून लावले होते. मात्र यावेळी झालेल्या हिंसाचारात पीटीआयचे १२ कार्यकर्ते ठार झाले होते. तर शेकडो जणांना पोलिसांनी अटक केली होती.
या हिंसक आंदोलन प्रकरणी इस्लामाबाद पोलिसांनी ९६ संशयितांची यादी दहशतवाद विरोधी न्यायालयामध्ये सादर केली. यामध्ये इम्रान खान, बुशरा बिबी आणि गंदापूर यांच्याव्यतिरिक्त पक्षाचे माजी अध्यक्ष आरिफ अल्वी, संसदेचे माजी सभापती असाद कैसर, पीटीआयचे अध्यक्ष गोहर खान, नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते उमर अयुब खान आणि इतर अनेकजणांचा समावेश आहे.
न्यायालयाने या सर्वांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. या सर्वांवर पोलिसांवर हल्ला, हल्ल्याचे कारस्थान आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा आपल्या लाभासाठी वापर करून घेण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. इम्रान खान गेल्या वर्षापासून तुरुंगातच असून त्यांना अन्य प्रकरणात पोलीस आणि न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.