दिग्विजय सिंहांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

हैदराबाद – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात 2017 मध्ये दाखल करण्यात आलेल्या बदनामीच्या एका प्रकरणी स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. बदनामीच्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. एआयएमआयएम पक्षाने सिंह यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीच्या आधारे हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. लोकप्रतिनिधींविरोधातील खटल्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे.

 

हैदराबादचे खासदार असलेले असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम हा पक्ष इतर राज्यांमध्ये केवळ आर्थिक लाभ मिळवण्यासाठी निवडणूका लढवत आहे, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्याला एआयएमआयएमचे नेते एस.ए.हुसैन अन्वर यांनी आक्षेप घेऊन दिग्विजय सिंह यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. या संदर्भात दिग्विजय सिंह आणि त्यांचे वक्‍तव्य प्रकाशित करणाऱ्या उर्दू दैनिकाच्या संपादकांना नोटीस बजावण्यात आली होती. गेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने दिग्विजय सिंह आणि संबंधित संपादकांनी 22 फेब्रुवारीच्या सुनावणीला उपस्थित रहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. आजच्या सुनावणीला संपादक उपस्थित होते. मात्र दिग्विजय सिंह अनुपस्थित होते.

 

या खटल्याच्या सुनावणीला वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित राहण्याची परवानगी मागणारी याचिका दिग्विजय सिंह यांच्यावतीने दाखल केली गेली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि पुढील सुनावणी 8 मार्च रोजी निश्‍चित केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.