“दिल्ली क्राईम’ या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजमध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या रोलमध्ये शेफाली शाहची इमानदार पोलीस अधिकारी महिलेची भूमिका खूप गाजली होती. गेल्यावर्षी कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कोणत्याही भारतीय कलाकारापेक्षाही शेफाली शाहचा परफॉर्मन्स खूप गाजला होता. तिच्या या रोलची दखल घेऊन तिला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्यापैकी एक सिंगापूरमधील एशियन ऍकेडमी क्रिएटिव्ह ऍवॉर्डसचा आहे. यामधील “बेस्ट ऍक्टर’चा पुरस्कार शेफाली शाहला मिळाला.
‘दिल्ली क्राईम’ची लोकप्रियता बघून आता आंतरराष्ट्रीय ऍमी ऍवॉर्डससाठीही नामांकन मिळाले आहे. इंटरनॅशनल ऍकेडमी ऑफ टेलिव्हिजन आर्टस ऍन्ड सायन्सेसने अलीकडेच वेगवेगळ्या श्रेणींमधील नामांकनांची घोषणा केली. त्यात शेफाली शाहच्या रोललाही नामांकन मिळाल्याचा उल्लेख आहे.
2012 मधील निर्भया बलात्कार तपासापासून निदर्शने करणाऱ्यांबद्दल रोष असलेल्या पोलीस अधिकारी महिलेचा रोल शेफाली शाहने केला होता. आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याने शेफालीच्या उत्साहाला पारावार राहिलेला नाही. हे नामांकन मिळण्यास पात्र ठरावा, असा अन्य कोणताही शो आपल्याला माहिती नसल्याचे तिने सांगितले. पुरस्कारापेक्षाही ‘दिल्ली क्राईम’मधील वर्तिका चतुर्वेदीचा रोल साकारायला मिळणे, हाच आपल्यासाठी मोठा बहुमान असल्याचे तिने सांगितले.