fbpx

बारामतीत मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत

दोन दिवसांत शहरात तब्बल १९ जणांना चावा : नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

बारामती/डोर्लेवाडी – बारामती शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून या कुत्र्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले झाले आहे. शहरातील प्रगतीनगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी (दि. 4) व मंगळवारी (दि. 5) या दोन दिवसांत तब्बल 19 जणांना चावा घेतला असल्याने या कुत्र्याच्या दहशतीमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून कुत्री पकडण्याची मोहिम हाती घेतली असतील तरी कुत्र्यांची संख्याच इतकी प्रचंड आहे की त्यामुळे नागरिकांच्या जिवालाच या मुळे धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आता पुन्हा एकदा नागरिकांचे आंदोलन होणार अशीच चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी (दि. 5) सकाळी साडेदहाच्या सुमारास म.ए.सो. विद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला चावले, त्यानंतर शाळेतील गायत्री भगत या मुलीला या कुत्र्याने अक्षरशः जमिनीवर लोळवत तिच्या दोन्ही हातांचे लचके तोडले. त्यानंतर टीसी कॉलेज परिसरात तिघांना त्याने चावा घेतला. अनेकांच्या हातापायासह काही जणांच्या चेहऱ्यालाही या कुत्र्याने चावा घेतला आहे.

भयभीत झालेले नागरिक आंदोलन छेडण्याच्या तयारीत

नगरसेवक अमर धुमाळ यांनी ही घटना कळल्यानंतर तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात लस उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनीही तातडीने रुग्णांवर उपचार केले. दरम्यान, या अगोदर देखील कसबा या ठिकाणी अशाच पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला होता त्यात तो थोडक्‍यात बचावला होता. बारामती शहरातील अनेक नागरिकांनी बारामती नगरपालिकेला पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे;मात्र नगरपालिका याकडे काणाडोळा करत आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यानंतर नगरपालिकेला जाग येणार का, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मोकाट जनावरांचाही सुळसुळाट – बारामती शहरात मोकाट जनावरांचा देखील सुळसुळाट झाला आहे ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात, यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत. यामुळे मोकाट जनावरांबरोबर पिसाळलेल्या कुत्र्यांचा देखील बारामती नगरपालिकेने लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बारामती शहरात भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या 200 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. इंजेक्‍शन देण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने अँटी रेबीज सिरम या इंजेक्‍शनच्या तुटवडा आहे. बाहेरील तालुक्‍यातील रुग्ण देखील येत असल्याने आम्ही लस उपलब्ध ठेवत आहोत.
डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, बारामती

बारामती शहरात मोकाट व भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांचे जीव देखील धोक्‍यात आले आहेत. बारामती शहरातील विविध भागातून तक्रारी येत आहेत. मागील 15 दिवसांपासून 100 भटकी कुत्री पकडून त्यांना शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर योग्य ठिकाणी सोडले आहे. नागरिकांनी रस्त्यावर कुत्री दिसल्यास घाबरून न जाता सावकाश गाडी चालवावी. तसेच एखादे कुत्रे पिसाळले आहे, असे वाटल्यास त्याची तक्रार बारामती नगर पालिकेकडे करावी.
– बबलू कांबळे, प्रमुख, नेचर फ्रेंड्‌स ऑर्गनायझेशन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.