नवी दिल्ली – कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर नोटाबंदी, जीएसटीवर निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार सुरु असून एकीकडे नरेंद्र मोदी हे गांधी कुटुंबावर सतत टीका करत असताना दुसरीकडे प्रियांका गांधीदेखील जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानंतर प्रियांका गांधी यांनी मोदींना दुर्योधन म्हटले होते.
प्रियांका गांधी म्हणाल्या, एक दिल्लीची मुलगी तुम्हाला खुले आव्हान देत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात नोटाबंदीवर लढा, जीएसटीवर लढा, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लढा आणि देशातील तरुणांना तुम्ही जी खोटी आश्वासने दिलीत त्यावर लढा, जी फसवणूक केलीत त्यावर लढून दाखवा, असे त्यांनी म्हटले आहे.
अभ्यास न करता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी त्यांची परिस्थिती आहे. असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. त्यांची परिस्थिती अभ्यास न करता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी झाली आहे. जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा सांगतात, काय करु नेहरुजींना माझा कागद घेतला आणि लपवला. इंदिरा गांधींनी मी अभ्यास केलेल्या कागदाची बोट बनवली आणि पाण्यात बुडवली, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आहे.