शहरातील ध्वनिप्रदूषण वाढले : शांतता क्षेत्रातही ओलांडली पातळी
पिंपरी – शहरातील निवासी आणि व्यावसायिक पट्ट्यातील निश्चित कमाल मर्यादेच्या तुलनेत ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. शांतता क्षेत्रात तरी किमान ध्वनिची पातळी मर्यादेत राहणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित भागातही ध्वनी प्रदूषणाचा स्तर उंचावलेला राहिल्याचेच चित्र पाहण्यास मिळाले आहे. शहरातील विविध भागांमध्ये ध्वनिची पातळी मोजल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
आवाजाची तीव्रता ही डेसिबल या एककात मोजली जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी सकाळी 75 तर, रात्री 70 डेसिबल इतकी ध्वनिची कमाल मर्यादा निश्चित केलेली आहे. व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा 65 तर, रात्री 55 डेसिबल इतके प्रमाण निश्चित केलेले आहे. निवासी क्षेत्रासाठी दिवसा 55 तर, रात्री 45 डेसिबल इतकी कमाल ध्वनीची पातळी असायला हवी. तर, शांतता क्षेत्रामध्ये दिवसा 50 आणि रात्री 40 इतकी ध्वनीची पातळी अपेक्षित आहे. साधारणत: 80 डेसिबलपर्यंतचा आवाज व्यक्तीला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्रास होतो.
रहिवाशी क्षेत्रात आवाजाची पातळी 71 डेसिबलपासून 73 डेसिबलपर्यंत गेली आहे. तर, व्यावसायिक पट्ट्यात 70 डेसिबलपासून 73 डेसिबलपर्यंत प्रमाण पोहचले आहे. शांतता क्षेत्रात 68 डेसिबलपासून 73 डेसिबलपर्यंत ध्वनीची पातळी ओलांडली गेल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचे निष्कर्ष महापालिकेच्या 2019-20 या वर्षाच्या पर्यावरण अहवालात नोंदविले आहेत. औद्योगिक पट्ट्यात ध्वनी प्रदुषणाने रात्रीच्या वेळी निश्चित मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास येते. औद्योगिक परिसरात 73 डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण मोजले गेले आहे.
2016-17 पासून 2018-19 अशा तीन वर्षांच्या पर्यावरण अहवालाचा तौलनिक अभ्यास केला असता, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध क्षेत्रांसाठी निश्चित केलेल्या ध्वनीच्या पातळीच्या तुलनेत रहिवाशी, व्यावसायिक, औद्योगिक आणि शांतता क्षेत्रातही ही पातळी ओलांडली गेल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पाठोपाठ गतवर्षी (2019-20) देखील ही ध्वनी पातळीची मर्यादा पाळण्यात यश आलेले नाही.
गणेशोत्सवात उच्चांक
वर्ष-2019 मध्ये गणेशोत्सवाच्या काळात 2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये ध्वनी पातळीची मोजणी करण्यात आली. 57.5 पासून 109.7 डेसिबलपर्यंत ध्वनी पातळी वाढली आहे. चापेकर चौक (चिंचवडगाव), शांतीनगर (पिंपरी) आणि भोसरी गावठाण अशा तीन भागांमध्ये ही ध्वनी पातळी मोजण्यात आली.
आवाजाची पातळी 73 डेसिबलपर्यंत
शहराच्या विविध भागांमध्ये रहिवाशी, व्यापारी, औद्योगिक आणि शांतता क्षेत्रामध्ये जून-2019 आणि फेब्रुवारी-2020 अशी दोन वेळा ध्वनीची मर्यादा मोजण्यात आली. ढोरेनगर-जुनी सांगवी, किवळेगाव, निगडी-प्राधिकरण या रहिवाशी भागामध्ये 71 ते 73 डेसिबल असे प्रमाण आढळले. शांतता क्षेत्रातंर्गत आदित्य बिर्ला रुग्णालय, चैतन्य रुग्णालय (चिंचवड), जयहिंद हायस्कूल (पिंपरी) अशा तीन ठिकाणी ध्वनीची मर्यादा मोजली गेली. 68.2 ते 73.5 डेसिबल इतके प्रमाण आढळले.
भोसरी एमआयडीसी क्षेत्रात 73.1 डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी वाढली आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये भारतमाता चौक (मोशी) आणि शिवाजी चौक (पिंपळे सौदागर) येथे ध्वनीची मर्यादा मोजली असता 70.1 ते 73.8 डेसिबल इतके प्रमाण आढळले आहे.