‘सायलेन्स झोन’मध्येही गोंगाटच!

पुणे – शहरातील ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत तब्बल 15 ते 20 डेसिबल इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नोंद ही राजाराम पूल, रामवाडी-जकात नाका, आरटीओ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिसरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक ध्वनी प्रदूषण हे शांतता क्षेत्रातच होत असल्याची नोंद पर्यावरण सद्यस्थिती अहवालात करण्यात आली आहे.

2018-2019चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल पालिकेने बुधवारी जाहीर केला. यात गेल्या 4 वर्षांत शहरातील ध्वनी प्रदूषण प्रचंड वाढल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार शहरातील निवासी, व्यावसायिक, शांतता अशा सर्वच क्षेत्रांना ध्वनी प्रदूषणाचा विळखा बसत असून, नियोजित प्रमाणापेक्षा जास्त आवाजाची नोंद घेण्यात आली आहे.

अहवालानुसार, रहिवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील आवाजाचे प्रमाण दिवसा 15 डेसिबलने जास्त, तर शांतता क्षेत्रातील आवाजाचे प्रमाण 20 डेसिबलने अधिक नोंदविले गेले आहे. वाढती वाहतूक हे यामागील मुख्य कारण असून लाऊडस्पीकर, मोठ्या आवाजात लावलेले रेडिओ, टीव्हीसारखी साधने, बांधकाम साधने, प्रेशर हॉर्न यांचादेखील समावेश असल्याचेदेखील या पर्यावरण अहवालात सांगण्यात आले आहे.

ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम
तात्पुरते अथवा कायमस्वरूपी बहिरेपण
मानसिक स्वास्थ्य बिघडते
मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम
काम करण्याची क्षमता कमी होते.
तीव्र अवाजामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
हृदयाची धडधड वाढणे, निद्रानाश, रक्तदाब वाढणे

प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयही विळख्यात
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. हा परिसर व्यावसायिक क्षेत्रात सामाविष्ट असून, येथे आवाजाची मर्यादा 65 डेसिबल ठरविली आहे. मात्र, नोंदीनुसार परिसरातील आवाजाचे प्रमाण 75 डेसिबल इतके आहे. महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक क्षेत्रातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषण येथे नोंदविण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)