वाहन तोडफोडीच्या घटनांत वाढ; घटनांत अल्पवयीन मुलांचा सहभाग
गुन्हे शाखेकडून गुन्हेगारांची झाडाझडती
– संजय कडू
पुणे – दाक्षिणात्य चित्रपटातील गुन्हेगारी टोळ्यांप्रमाणेच हातात कोयते घेऊन वाहनांवरून भरधाव फिरत परिसरात गोंधळ माजवणे. कोणी विरोध केल्यास वाहन, दुकान किंवा घराच्या खिडक्या, दरवाजांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवे. असे प्रकार सध्या शहरात घडताना दिसून येत आहे. अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याबरोबरच पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यांना आळा घालण्यासाठी आता गुन्हे शाखा सरसावली असून, वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांचे मागील तीन वर्षांचे रेकॉर्ड काढले आहेत. तर, या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांची झाडाझडती घेण्यात येत आहे.
मागील तीन वर्षांची आकडेवारी बघता दत्तवाडी, सिंहगड रस्ता, वारजे, कोंढवा, हडपसर, येरवडा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, कोथरुड, भारती विद्यापीठ अशा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच 90 टक्के वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात सहभागी व्यक्ती त्याच किंवा जवळच्या परिसरात राहणारी असते. त्यांचे वयही अगदी 14 ते 25 वर्षांपर्यंतचे असते. वाहन तोडफोडीचे प्रकार जुने वाद, दहशत पसरवणे आणि दुकानदारांकडून खंडणी उकळण्यासाठी होतात.
याशिवाय, परिसरात दहशत आणि नाव चर्चेला येण्यासाठी घडवून आणल्या जातात. अनेक प्रकरणात भीतीपोटी पीडित व्यक्ती तक्रार करत नाही. यामुळे गुन्हेगारांचा आत्मविश्वस वाढतो. तर, ज्यांच्या वाहनांवर हल्ला होतो त्यांचा घटनेशी काही संबंध नसतो. यातील अनेकांनी कर्जावर वाहने घेतलेली असतात. तर रिक्षा, टेम्पो असा हातावर व्यवसाय असणाऱ्यांचेही नुकसान होते.
अल्पवयीन मुलांचा सर्रास वापर
गुन्हेगार टोळ्यांतील अल्पवयीन मुलांची हेअर स्टाईल, पेहराव आणि वाहनांचे मॉडिफिकेशही दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच असते. दुसरीकडे गुन्ह्यात पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून अशा गुन्हेगारांना काही दिवस रिमांड होममध्ये ठेवण्यात येत. मात्र, तेथून सुटका झाल्यानंतर त्याच्यावर कायद्याचा धाक राहात नाही. गुन्हा केल्यानंतरही कोणी आपले काही वाकडे करू शकत नाही, हीच भावना त्यांच्यामध्ये रुजलेली दिसते. यामुळे काही मोठ्या गुन्हेगारी टोळ्याही गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा सर्रास वापर करताना दिसतात. या मुलांना खायला तसेच फिरण्यासाठी वाहनेही पुरवली जातात. बस एवढ्याच भांडवलावर ही मुले आपल्या भाईसाठी एखाद्याचा जीवही घ्यायलाही तयार होतात.
शहरातील वाढते तोडफोडीचे प्रकार लक्षात घेऊन मागील काही वर्षांत असे गुन्हे करणाऱ्यांची माहिती काढली आहे. इतर गुन्हेगारांची जसी तपासणी होते, तशीच या गुन्हेगारांचीही नियमीतपणे केली जाणार आहे. जेणेकरून संबंधीत गुन्हेगार पुन्हा असे प्रकार करणार नाहीत. तोडफोड करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा मोठा समावेश आहे. त्यांनाही समुपदेशन तसेच समज दिली जाईल.
– बच्चन सिंग, उपायुक्त, गुन्हे शाखा