नगर परिषदेच्या तलाव उत्खननातील भ्रष्टाचार उघड करणार
तळेगाव दाभाडे – भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता फक्त निषेध मोर्चेच काढावेत. विकास झाला की नाही आता हे जनताच सांगेल. आता पाच वर्षांत कामाचे प्लेक्स नाही तर कामाची स्पर्धाच लागणार आहे, असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (दि. 1) वैशाली मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
पुढे बोलतांना शेळके म्हणाले, मावळ तालुक्यातील लोणावळा व कान्हे या दोन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहेत. तर, कान्हे व नाणे रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करणार असून, सोमाटणे, लिंब फाटा, वडगाव-तळेगाव फाटा, कान्हे आदी ठिकाणी उड्डाणपूल पूर्ण करणार आहे. तसेच, 284 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना औद्योगिक कंपनीच्या सीएसआर फंडातून हायटेक शाळा करणार आहे. याबरोबरच एमआयडीसी 4 टप्प्यातील संपादन होत असताना, स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. तर, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या तलावाचे उत्खननात झालेला भ्रष्टाचार उघड करणार आहे. यानंतर, आमदार रोहित पवार, विजय कोलते, भारद्वाज पगारे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री मदन बाफना तर, प्रमुख उपस्थितीत आमदार रोहित पवार, माजी आमदार रमेश थोरात, यांच्यासह विजय कोलते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, बाबुराव वायकर, अर्चना घारे, नगरसेवक गणेश काकडे, किशोर भेगडे, सुरेश धोत्रे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, सचिन घोटकुले, अंकुश आंबेकर, हेमलता काळोखे, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, ऍड. कृष्णा दाभोळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.