चार महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही
उंब्रज – भुयाचीवाडी,कोर्टी, उंब्रज हनुमानवाडी सह परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला कराड तालुक्यातील कृष्णा नदीवरील कोणेगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीची मागणी पंचक्रोशीतील शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी अधिकारी यांच्या समवेत तातडीने बंधाऱ्याची पाहणी करून येत्या चार महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले जाईल अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. लाखो रुपये खर्चून बांधलेला कोणेगाव-हनुमानवाडी गावच्या हद्दीतील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (केटीवेअर) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापूराने वाहून गेला आहे. या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेतजमीनी बागायती झाल्या आहेत.
या बंधाऱ्यामुळे भुयाचीवाडी, कोर्टीसह उंब्रज परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बागायती होण्यास मदत झाली होती. मात्र सध्या हा बंधारा महापूराने वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या बंधाऱ्यामुळे चार हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापूरामुळे महापुराने हा बंधारा वाहून गेला आहे. त्यांमुळे शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण होण्याबरोबरच उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होवून शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
बंधाऱ्यामुळे कोणेगाव येथे कृष्णा नदीच्या पाण्याला अटकाव होऊन सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून उभा राहिलेल्या उंब्रज, कोर्टी, शिवडे, हनुमानवाडी येथील पाणी योजनांसह शेतकऱ्यांच्या वैयक्तिक योजनांनाही पाणी मिळत होते. तसेच उंब्रज येथील नळपाणी योजनेलाही या बंधाऱ्यांचा फायदा झाला होता. मात्र महापुराने हा बंधारा वाहून गेल्याने शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तसेच अनेक गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न धोक्यात आला आहे.
दरम्यान सदर वाहून गेलेल्या बंधाऱ्याची पाहणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी अधिकारी यांच्या समवेत केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पतंगराव माने, तालुका प्रमुख सुनिल पाटील, भानुदास पोळ, सतीश पाटील, रवींद्र सूर्यवंशी, विजय जाधव, रामकृष्ण शिंदे यांच्या सह कोणेगाव व हनुमानवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.