सिंहगडरस्ता, दि. 10 (प्रतिनिधी) -सिंहगड रस्त्यावर हिंगणे येथील विश्रांतीनगर भागात पुणे महानगरपालिकेतर्फे बहुउद्देशीय इमारत 2010 पासून बांधून तयार आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रासाठी किंवा रक्त संकलन पिढीसाठी या इमारतीचे नियोजन करण्याचे ठरले होते; परंतु हे नियोजन फक्त कागदोपत्रीच राहिले असून तसे काही झालेले नाही. येथे करोना काळामध्ये “कोविड सेंटर’साठीही स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे सध्या ही इमारत केवळ एक आधार कार्ड केंद्र, आरोग्य सेवकांची कोठी अशा जुजबी कामांसाठी वापरली जात आहे.
स्थानिक नागरिक यावर म्हणतात की, कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने ही बहुउद्देशीय इमारत कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधली; परंतु तिचा वापर ज्या कामांसाठी केला जाणे अपेक्षित होते त्याऐवजी अन्य कामांसाठीच होत आहे. यातून नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाल्याचे दिसत आहे. शहराच्या मध्यभागी ही इमारत आहे आणि मोक्याच्या ठिकाणी आहे, तिचा योग्य कारणासाठी वापर होणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी काहीच बोलण्यास तयार नाहीत. सध्या, या इमारतीची दुरवस्था झाली आहे. पान, गुटखा खाऊन जागोजागी काहींनी पिचकाऱ्या मारल्या आहेत. या इमारतीला रखवालदारही नाही. रात्रीच्या वेळी काहीजण येथे झोपण्यासाठी येतात.