प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या सूचना
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहर व तालुक्यातील करोना साखळी संपुष्टात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व शांतता समितीने केलेल्या उपाययोजनांची माहिती आढावा बैठकत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कला मंच येथे सोशल डिस्टन्सचे पालन करून झालेल्या या बैठकी प्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ऍड. आर. बी. सोनवणे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, नगरपालिकेचे सीईओ सचिन बांगर, पंचायत समिती बीडीओ सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तालुका आरोग्याधिकारी सुरेश घोलप, ऍड. आर. बी. सोनवणे आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तालुका व शहरातील करोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना, तसेच गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती ना. थोरात यांनी घेऊन प्रशासक की अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. ते म्हणाले, राज्यात व तालुक्यात करोनाची साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन चांगले काम करत आहे. मात्र त्याला नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. हा संकटाचा काळ आहे. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व द्यावे. गणेशोत्सव हा राज्यातील प्रमुख उत्सव आहे. मात्र करोनाच्या संकटामुळे त्यावर विरजण पडले आहे. गणेशविसर्जनावेळी नागरिकांनी नगरपालिकेने निर्माण केलेल्या संकलन केंद्रावर मंडळांनी व घरातील गणेश मूर्ती जमा कराव्यात. तसेच करोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे. प्रशासनानेही ही या काळात सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आ. डॉ. तांबे यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करत संकलन केंद्रात आपले गणपती दान करावेत, असे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील विविध गावांच्या परिस्थितीचा आढावा प्रांताधिकाऱ्यांनी दिला. कोविड केअर सेंटरमधील सुविधांची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.