पुणे – एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील 24 दिवसांपासून संप पुकारला आहे. काही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सुरूवात केली आहे. तर, अद्यापही अनेक कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. गुरुवारी राज्यात सुमारे 18 हजारांहून अधिक कर्मचारी हजर झाले. मात्र, पुणे विभागात गुरुवारी एकही कर्मचारी हजर झाला नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनात व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दि. 8 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून, 24 दिवसांनंतरही कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. वेतनवाढीच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, विलीनीकरण होईपर्यंत संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
गुरुवारी पुणे विभागात…
पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट, बारामती, दौंड या आगारांतून 104 बसेस धावल्या. यामध्ये 34 शिवनेरी, 64 शिवशाही आणि 6 साध्या बसेसचा समावेश आहे. दादर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, कल्याण, अहमदनगर, स्वारगेट, चौफुला, बारामती आदी मार्गांवर बसेस धावल्या. शिवनेरी आणि शिवशाही संख्या अधिक असली तरी साध्या बसेस (लालपरी) तुरळक आहेत.
आणखी 498 कर्मचारी निलंबित…
गुरुवारी राज्यातील 498 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 9 हजार 141 झाली आहे. तर, 36 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली असून आजपर्यंत सेवासमाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 928 वर पोहोचली आहे.
एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम
गुरुवारी राज्यात हजर झालेले कर्मचारी….
प्रशासकीय 9115
कार्यशाळा 5301
चालक 2127
वाहक 2339
एकूण 18882