लंडन – ऑक्स्फर्डच्या करोना विरोधी लशीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी या लशीची चाचणी थांबवण्यात आल्यामुळे नैराश्य दाटून आले होते. नंतर चाचणी पुन्हा सुरू झाल्यावर दिलासाही मिळाला होता. आता निश्वास सोडण्याची आणखी एक घटना घडली आहे. ज्या रूग्णात साइड इफेक्ट दिसू लागल्यामुळे लशीची चाचणी थांबवण्यात आली होती, त्या साइड इफेक्टशी लशीचा काही संबंध नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ज्या स्वंसेवकांवर चाचणी घेण्यात आली होती, त्यांना ऑक्स्फर्डकडून दस्तावेज पाठवण्यात आले होते. त्याच्या तपासणीनंतर लस सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
एका स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर मागच्या बाजूला मोठी सूज आली होती. त्यामुळे लशीचा हा परिणाम आहे किंवा कसे याची शाहनिशा करण्यासाठी चाचणी थांबवण्यात आली होती.
लस तयार करण्याच्या स्पर्धेत ऑक्स्फर्ड ऍस्ट्राझेनेका सगळ्यांत पुढे असून आता पुढच्या महिन्यात त्यांच्या अंतिम चाचण्यांची निष्कर्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत लस पूर्णपणे तयार झालेली असेल असा दावा ऍस्ट्राझेनेकाने अगोदरच केला आहे.