ना. औटींमुळे हिमोफिलिया रुग्णांना दिलासा

पारनेर – गेल्या साडे चार वर्षांपासून निविदा प्रक्रियेत रखडलेल्या हिमोफिलिया रुग्णांच्या औषध खरेदीचा मार्ग विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रयत्नांमुळे सुकर झाला असून तब्बल साडेपंधरा कोटींची औषधे खरेदी करण्यात आली आहे. लवकरच राज्यात या औषधांचा पुरवठा होणार आहे.

राज्यात हिमोफिलिया रुग्णांसाठी शासनाने तरतूद केली. महाराष्ट्रातील 9 डे केअर सेंटरच्या माध्यमातून जीवरक्षक औषधांचा पुरवठा केला जात आहे. गेल्या साडे वर्षापासून लालफितीत अडकलेली निविदेला अखेर मुहूर्त मिळाला असून साडे पंधरा कोटी रूपयांचे औषध खरेदी झाले आहे. त्यामुळे हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हिमोफिलिया औषधांसाठी अनेकवेळा निविदा होवूनही फार्मा कंपनी वअधिकारी यांच्यामध्ये एकमत न झाल्याने निविदेला ग्रहण लागले होते. अखेर हे ग्रहण आता सुटले आहे. राज्यामध्ये हिमोफिलियाचे साडेचार ते पाच हजार अधिकृत नोंदणीधारक रूग्ण आहेत. या रुग्णांसाठी शासनाने मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर असे 9 डे केअर सेंटर असून शासनाने सन 2016-17 या वर्षापासून अँन्टी हिमोफिलिया फॅक्‍टर खरेदी केले नव्हते. त्यामुळे राज्यातील अनेक हिमोफिलिया रुग्णांची अवस्था बिकट झाली.

अपंगत्वाच्या प्रमाणात वाढ होत असून अनेक रूग्ण दगावल्याच्या घटनेकडे लक्ष वेधत वारंवार आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले. ही औषधे संपू लागल्याने आयुक्त डॉ. अलोककुमार यादव यांनी औषधे खरेदी प्रक्रियेसाठी उशीर झाल्याबद्दल शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.
अधिवेशना दरम्यान ना. विजय औटी यांच्याकडे नगरचे अध्यक्ष दादा भालेकर यांनी हिमोफिलिया रुग्णांच्या औषधांसाठी गेली साडेचार वर्षे निविदा झाली नसल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर ना. औटी यांनी औषध खरेदी संदर्भात डॉ. अनुपकुमार यादव, डॉ.नितीन अंबाडेकर, सुहास मोनाळकर यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून औषधांचा पुरवठा केला जाईल असे स्पष्ट केले. त्यानुसार आरोग्य विभागाने फार्मा कंपन्यांना पुरवठा करण्याचे निर्देश दिले असून चार पाच दिवसांत डे केअर सेंटरला औषधांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे हिमोफिलिया रुग्णांना औषधे आता उपलब्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.