मुंबई – मुंबईतील पत्राचाळ प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना पुन्हा चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या आधीच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र सादर केले असून त्यात मनिलॉंडरिंग प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याची दखल घेत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, असे त्यांच्या वकिलांनी आज कोर्टात नमूद केले.