Kunal Kamra | कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदेंवर केलेल्या टिप्पणीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली.
या प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘कामरा याने माफी मागितली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचा काम केलं हे चुकीचं आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता यावर कुणाल कामराच्या प्रतिक्रिया समोर आली आहे. कामराने आपण केलेल्या वक्तव्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी विरोधी पक्षांकडून पैसे मिळाल्याचे आरोप देखील कुणाल कामराने फेटाळले आहेत. हवे असल्यास बँक खाती तपासू शकता, असे त्याने म्हटले आहे.
मुंबई पोलिसांकडून त्याची फोनवर प्राथमिक चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले. तसेच, आपल्याला वक्तव्यांचा कोणताही पश्चाताप नाही. वक्तव्य मागे घेणार नाही. आपण न्यायालयाने सांगितले तरचं माफी मागू, असे म्हणत कुणाल कामराने त्याची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, कुणाल कामराने एका विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. कामराच्या या वादग्रस्त गाण्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात कुणाल कामराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.