दादा म्हणतो, तूर्त नो पॉलिटिक्‍स

कोलकता -क्रिकेट जगतात दादा या नावाने ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने तूर्त राजकीय खेळीचा कुठला विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गांगुली राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना काही काळ तरी पूर्णविराम मिळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष बनण्यास गांगुली सज्ज झाला आहे. त्याचे नाव निश्‍चित होण्याआधी त्याची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी भेट झाली. त्या भेटीमुळे तर्क-वितर्क सुरू झाले. पश्‍चिम बंगालमधील पुढील विधानसभा निवडणूक गांगुलीने भाजपच्या तिकिटावर लढवावी. त्याबदल्यात त्याला बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात येईल, अशी ऑफर त्याला देण्यात आल्याच्या चर्चाही सुरू झाल्या.

त्याविषयीचा प्रश्‍न येथे पत्रकारांनी गांगुली याला विचारला. त्यावर त्याने नकारार्थी उत्तर दिले. शहा यांच्याशी कुठलीही राजकीय स्वरूपाची चर्चा झाली नसल्याचे त्याने म्हटले. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी माझी अनेकदा भेट झाली. त्या भेटींवरूनही मला राजकारण प्रवेशाबाबतचे प्रश्‍न विचारण्यात आले, अशी पुस्तीही त्याने जोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.