म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावेत. एकूण 131 रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
तसेच म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन टाकते त्याप्रमाणेच वाटप केलं जात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. इंजेक्शन्स उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
वर्ध्यात म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन्सचं उत्पादन सुरू केल्याने त्यांनी गडकरींचं अभिनंदन केलं. त्यामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन्स मिळतील, असंही ते म्हणाले. यावेळी लसीकरणावरही भाष्य केलं. ग्लोबल टेंडर काढलं आहे. पण त्यात तांत्रिक मुद्दे निर्माण झाले आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यात केंद्रानेही हस्तक्षेप केला पाहिजे. हा सर्व विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे. लसीकरणाला लागणारा निधी आम्ही तयार करून ठेवला आहे. एका चेकने सर्व रक्कम द्यायला आम्ही तयार आहोत. हे आम्ही वारंवार सांगतोय. आता फक्त केंद्राने लस द्यायला हवी, असं त्यांनी सांगितलं. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत देशात अजून कोणतंही धोरण ठरलेलं नाही. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं सांगितलं जातंय. आम्ही त्याची सगळी तयारी करत आहोत, असंही राजेश टोपेनी स्पष्ट केलं.