डक्टवरील प्लायवूड तुटल्याने दोन मुली पाचव्या मजल्यावरून कोसळल्या
पिंपरी – दोन दिवसांपूर्वी नंदीनीचा वाढदिवस साजरा केला. भाऊबीजेच्या दिवशी तिने भावाला ओवाळले. लहाग्या भावाकडून तिला खाऊपुरते पैसे मिळाल्याने ती आनंदात होती. मात्र तिचे हे सुख कदाचित नियतीलाही मान्य नसावे. मैत्रिणीसोबत टेरेसवर डोंगरपाणी खेळत असताना ती इमारतीच्या डक्टवर टाकलेल्या प्लायवुडवर त्या दोघी मैत्रिणी चढल्या. काही कळायच्या आत प्लायवुड तुटून त्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या. त्यापैकी नंदिनीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 16) भाऊबीजेच्या दिवशी काळेवाडी येथे घडली.
नंदिनी अनिल म्हेत्रे (वय 12, रा. काळेवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर तिची मैत्रीण धनश्री कदम (वय 12) ही गंभीर जखमी झाली आहे. त्या दोघीही माने शाळेतील विद्यार्थिनी आहेत. नंदिनी ही मूळच्या आंध्रप्रदेश येथील असून तिला एक बहीण आणि भाऊ आहे. तिचे वडील प्लंबरचे काम करतात तर आई धुणीभांडीचे काम करते. लक्ष्मी पूजनच्या दिवशी (दि. 14) नंदिनीचा वाढदिवस केक कापून साजरा केला. यावेळी धनश्री ही देखील आली होती. धनश्रीने नंदीनीला केक भरविताचे फोटोही काढले.
वाढदिवसाच्या दोन दिवसांनी भाऊबीज होती. सकाळी तिने भाऊ साईकृष्ण याला औक्षण केले. भावाकडून ओवाळणी मिळाल्याने नंदिनी आणखीनच खुश होती. सायंकाळी चारच्या सुमारास नंदीनीची मैत्रीण धनश्री ही तिला खेळण्याकरिता आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आली. त्या दोघींच्या आग्रहाखातर नंदिनीची आई लक्ष्मी हिने काही वेळ खेळण्यासाठी परवागनी दिली.
धनश्री राहत असलेल्या गणेश वंदना इमारतीच्या टेरेसवर धनश्री, नंदिनी आणि धनश्रीचा भाऊ डोंगरपाणी खेळत होती. डोंगरावर चढण्याठी त्या दोघी टेरेसवरील डक्टवर ठेवलेल्या प्लायवुडवर बसल्या. पावसामुळे कुजलेला प्लायवुड तुटून त्या तिसऱ्या मजल्यावरील बीमवर जाऊन आदळल्या. तेथून त्या रस्त्यावरील बाजूस खाली पडल्या. यात डोक्याला मार लागलेली नंदिनी हिचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या धनश्रीवर आकुर्डीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओम नमः शिवायचा जप सुरू
धनश्री आणि नंदिनी पाचव्या मजल्यावरून पडल्यानंतर नंदिनीचा जागीच मृत्यू झाला. तर धनश्री हिचे दात पडले आणि पायही फॅक्चर झाला. धनश्री ही शंकराची भक्ती करते. इमारतीवरून खाली पडून जखमी झालेल्या धनश्री हिच्या तोंडून “ओम नमः शिवाय’चा जप सुरू होता.