जेरुसलेम – इस्रायलच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पुन्हा स्पष्ट बहुमत मिळाले नाही. निवडणुकीतील 90 टक्के मतमोजणी पूर्ण झल्यानंतर देशाच्या राजकारणातील बहुमताबाबतची कोंडी यापुढेही कायमच राहण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला सर्वाधिक 30 जागा मिळाल्या आहेत. मात्र, उजव्या विचारसरणीच्या त्यांच्या पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही.
आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 61 जागांचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले नाही. बेंजामिन नेतान्याहू यांच्याबरोबर त्यांचे विरोधी असलेल्या डाव्या, उजव्या आणि मध्यममार्गी असलेल्या पक्षांनाही निवडणुकीत बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सलग पाचव्यांदा झालेल्या निवडणुकीनंतरही राजकीय कोंडी कायमच राहणार आहे.
मात्र, उजव्या विचारसरणीच्या यामिना पार्टीबरोबर लिकुड पक्षाची अघाडी होण्याची शक्यता आहे. इस्लामिस्ट युनायटेड अरब लिस्ट पक्षाने अचानक मुसंडी मारून लक्ष वेधून घेतले आहे.
इस्रायलच्या निवडणुकीत 67.2 टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा हे प्रमाण 4.3 टाक्क्यांनी कमी आहे. एवढेच नव्हे तर गेल्या दोन वर्षात झालेल्या चारही वेळाच्या निवडणुकीतील मतदानाचे हे सर्वात कमी प्रमाण आहे. राजकारणातील गटबाजीमुळेच नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. तसेच वारंवार निवडणुका होण्याने नागरिकांमध्ये निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचेही काही तज्ज्ञांचे मत आहे.