सासवड शहरात नो पार्किंगच बनले पार्किंग

सासवड – शहरातील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग ही सध्या सासवडकरांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. शहरातून पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग जातो. या महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे. आता एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे सासवड बसस्थानकासमोर महामार्गावरच केले जाणारे वाहनांचे नो पार्किंग झोन मधील पार्किंग. यामुळे वाहतूक कोंडी होत असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे आर्श्‍चय व्यक्‍त केले जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून महामार्गावर दुभाजक बसविण्याची मागणी केली जात होती. उशीरा का होईना पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हिवरकर मळा ते सासवड पीएमटी बसस्थानक या दरम्यान रस्ते दुभाजक बसविला आहे. आता दुभाकांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. बसस्थानका समोरील अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईचे सासवडकरांनी तोंड भरून कौतुकही केले. पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांनी या ठिकाणी नो पार्किंग झोनचे बोर्ड देखील लावले. मात्र, अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच या ठिकाणी वडाप आणि अनधिकृत खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहने पार्किंग केले जात आहे.

त्यामुळे महामार्गावर अपघात प्रमाण वाढले असून शहरातील वाहतूक कोंडी देखील वाढली आहे. वाहने चालविताना विशेषतः दुचाकीस्वारांचे एकमेकांना वाहने घासून किरकोळ वाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर होणे ही एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे. पोलीस प्रशानाचे शहरातील या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का असाही सवाल आता सासवडकरांना पडला आहे. रविवार, गुरूवार, शनिवार, अमावस्या, पौर्णिमा आणि सलग सुट्टीच्या दिवशी बाहेरगावाहून जेजुरी, नारायणपूर, केतकावळे, पुरंदर किल्ला या ठिकाणी भेट देणारे भक्त-भाविक आणि पर्यटक देखील याठिकाणी नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्किंग करीत आहेत.

दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले
शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पुणे ग्रामीण पोलीस अथवा इतर ठिकाणी चोर सापडल्यावर शहरातील चोरी गेलेल्या दुचाकी सापडतात. त्यामुळे शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सासवड पोलिसांकडून केला जातो की नाही असाच प्रश्‍न निर्माण होत आहे?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.