सातारा – सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी गेल्या काही महिन्यांत वाहुतकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईची मोहीम वेगाने राबविली होती. त्यामुळे अल्पवयीन तरुणाईच्या हातात आता वाहन दिसत नाही. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने “नो पार्किंग’ मधील वाहनांवर कारवाई केली होती. परिणामी वाहतुकीला कशीबशी शिस्त लागत होती. परंतु, गेले दोन महिने वाहतूक शाखेची क्रेन बंद झाल्याने पुन्हा “नो पार्किंग’ चा फज्जा उडाला आहे.
“नो पार्किंग’च्या प्रश्नाबरोबरच इतर वाहतुकीलाही अजिबात शिस्त राहिली नाही. प्रमुख रस्त्यांवरील चौकात अवजड वाहने उभी असतात. अरूंद रस्ते, त्यातच हातगाड्यांचे अतिक्रमणही झाले आहे. अनेकजण इमारतींचे तळघर पार्किंगसाठी न वापरता त्याचा व्यावसायिक वापर करतात. त्यामुळे पार्किंग सर्रासपणे रस्त्यावर केले जात आहे. परिणामी शहरातील वाहतूक कोंडी वाढताना दिसत आहे.
दरवर्षी वाढती वाहनांची संख्या व त्यातच वाढती अतिक्रमणे यामुळे पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणत निर्माण झाला आहे. अशातच वाहतूक शाखेची क्रेन बंद असल्याने शहरातील वाहनधारकांना शिस्त राहिली नाही. परिणामी नागरिकांनी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वायसी कॉलेज परिसरात तर खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच काळी पिवळी टॅक्सी भरचौकात अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या असतात.
त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडते. शहरातील एकेरी वाहतुकीचे नियमही सध्या धाब्यावर बसविले जात आहेत. त्यामुळे जुनी भाजी मंडई, वाहतूक शाखेसमोरून पोवई नाका, बसस्थानक परिसरात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचप्रमाणे तहसील कार्यालय परिसर, बसस्थानक रोड, भाजी मंडई, खण आळी, राधिका रोड इत्यादी ठिकाणी “नो पार्किंग’ झोनमध्ये वाहने लावली जात आहेत.
अशातच पोलिसांनी कारवाई केली तर अनेकजण पोलिसांशी हुज्जत घालत असल्याच्या घटना घडत आहेत. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वाहतूक पोलिसांची कसरत होत आहे. एक दिशा मार्गावर वाहनावर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात आहे. परंतु, यातही राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कारवाईस अडचण निर्माण होत असल्याचे एका पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
क्रेन सुरू करण्याबाबत वाहनधारकांकडून निविदा मागवल्या होत्या. त्या प्राप्त झाल्यानंतर वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करून घेतली आहे. उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण करून शहरात क्रेन कार्यरत करू.
विठ्ठल शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा