इंदापूर, (प्रतिनिधी)- इतक्या विश्वासाच्या नात्याने मला खासदार म्हणून तुम्ही निवडून दिले आहे. जो कोणी आमच्यासोबत संघर्षाच्या कालावधीत राहिला.
यातील एकालाही, नाराजीची भावना येऊ देणार नाही. प्रत्येकाची जबाबदारी सुप्रिया सुळे वैयक्तिक घेईल. जो कोणी वैयक्तिक नाराज असेल कदाचित, त्याची समजूत काढायची जबाबदारी माझी असेल. त्यामुळे तालुक्यातील जनतेने काळजी करू नये, असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्याचा शब्द देत, त्यांनी हजारो उपस्थितांना हर्षवर्धन पाटील यांना साथ देण्यासाठी आव्हान केले आहे.
सुळे म्हणाल्या की, शेवटी ज्यावेळेस आपल्या जबाबदार्या येतात. त्यावेळेस चांगले आणि वाईट अशा दोन जबाबदार्या असतात. तेव्हा सगळ्या जबाबदार्या, आपण सर्व मिळून सोडवू, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ज्याला तिकीट देईल त्याला आम्ही पराकष्टा करून इंदापूर तालुक्यातून आमदार देऊ.
हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने जुनी सर्व नाती एकवटत आहेत. कधी आपण झोपलो की वाईट स्वप्न येतात ते स्वप्न निघून गेले की, एक सुंदर सकाळ होते आणि ती सकाळ हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने सुरू होत आहे.
एकीकडे बहिणींना पंधराशे रुपये देता आणि दुसरीकडे खाण्याचे तेलदर वाढवता. गॅसच्या किमती वाढवता, दुसर्या खिशातून पाच हजार रुपये काढता हे बरे नव्हे; असा सरकारवर घणाघात करत, ऐन दिवाळीच्या सणाला 2350 तेलाचा भाव केला आहे.
सामान्य माणसाच्या पदरात काय पडते, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला.
मी कॉन्ट्रॅक्टर यांना नावे ठेवत होते; परंतु सुदामाप्पा इंगळे यांनी मला सांगितले कॉन्ट्रॅक्टरची काहीही चूक नाही. जे हप्ते काढतात त्यांची चूक आहे.
त्यामुळे मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला नावे ठेवत नाही. परंतु ते म्हणाले ताई ह्याला तीन टक्के त्याला पाच टक्के असे करत करत 40 टक्क्यांचे हे सरकार झाले आहे. म्हणूनच या राज्य सरकारला हद्दपार करायचे आहे.-सुप्रिया सुळे, खासदार
सत्तेसाठी लढाई नाही
खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाले की सत्तेसाठी अजिबात पक्षाची लढाई नाही. स्वाभिमानी माणसासाठी लढाई सुरू आहे. राज्यातील बहिणींना पैसे मिळाले आनंद वाटला. परंतु ही लाडकी बहीण कधी झाली, लोकसभा निवडणुकीत बहिणीने जोरदार दणका दिला. त्यावेळेस बहिणी कळल्या असा टोला मंत्री अजित पवार यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.