मेट्रो प्रस्तावित स्टेशनमुळे नागरिकांमध्ये भीती
पुणे – कसबा पेठेतील मेट्रोच्या प्रस्तावित स्टेशनमुळे कोणत्याही नागरिकाला विस्थापित केले जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गावर कसबा पेठ (फडके हौद) येथे मेट्रोचे भुयारी स्टेशन प्रस्तावित आहे. या स्टेशनमुळे विस्थापित होण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी स्टेशनला तीव्र विरोध असून, गेल्या महिन्यात फडके हौद चौकात आंदोलन तीव्र करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बापट यांनी शुक्रवारी मेट्रो स्टेशनमुळे एकाही रहिवासी-व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, याची हमी दिली.
गेल्या तीस वर्षांपासून कसब्याचा आमदार असल्याने तेथील सर्व नागरिकांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. सर्व बाधित नागरिकांचे पुनर्वसन प्रस्तावित स्टेशनपासून चारशे ते पाचशे मीटर परिसरात केले जाणार आहे. कोणालाही बेघर केले जाणार नाही, असे स्पष्ट करत बापट यांनी त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले.
नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महापालिका आणि मेट्रो प्रशासनासोबत सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. महापालिकेकडून मिळणाऱ्या शाळेच्या जागेवर नव्याने इमारत बांधून सर्व नागरिकांना नवीन घर देण्यात येईल. जागामालक आणि भाडेकरू अशा दोघांच्या हिताचे निर्णय घेण्यात येईल. कोणीही घरापासून वंचित राहणार नाही. सध्याच्या राहत्या घरापासून पाचशे मीटरच्या आत सर्वांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, असे बापट यांनी नमूद केले.
कोंडदेव शाळेचा प्रस्ताव मान्य
कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळा अनेक वर्षांपासून बंद आहे. ही शाळा कायम ठेवून उर्वरित जागेमध्ये नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आहे. शहर सुधारणा समितीने शुक्रवारी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, मुख्य सभेची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. सरकारकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर तेथे प्रत्यक्ष काम सुरू करता येणार आहे, असे संकेत त्यांनी दिले.
नगर रस्त्यावर भुयारी मेट्रो
आगाखान पॅलेससमोर मेट्रोचे बांधकाम करण्यास राष्ट्रीय संरक्षित स्मारक समितीने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) परवानगी नाकारली. त्यानंतर, महामेट्रोने कल्याणीनगरमधून पर्यायी मार्गाची आखणी केली आहे. या मार्गालाही विरोध होत असल्याने पुढील काही दिवसांत नवी दिल्लीला जाऊन समितीची भेट घेणार असल्याचे बापट यांनी सांगितले. नगर रस्त्यावरून उन्नत मेट्रोऐवजी भुयारी मेट्रोला मान्यता द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा