पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही : आ. देसाई

सणबूर – ऑक्‍टोंबर मध्ये राज्यातील इतर जिल्ह्याबरोबर सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशा सूचना करीत कोणीही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहू नये, याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सक्त सूचना आ. शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांसमवेत अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नावडी, वेताळवाडी, सोनाईचीवाडी, दिवशी या गावातील शेतांमध्ये जावून पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी तहसिलदार रवींद्र माने, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, तालुका कृषी अधिकारी अविनाश मोरे यासह महसूल, ग्रामविकास व कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.
आमदार शंभूराज यांनी मतदारसंघात अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक गांवातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने हाती घेण्यासाठी आमदारकीचे प्रमाणपत्र हाती घेतले त्याच दिवशी व त्यानंतर दोन वेळा शासकीय अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठका घेवून नुकसानग्रस्त झालेला कोणीही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहू नये.

याची शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेसह शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत राज्यपाल यांची मुंबई येथे भेट घेवून यांचेकडेही नुकसान भरपाईबाबत मागणी केली होती. अतिवृष्टीने तालुक्‍यात 4140.82 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचेही आ. देसाई यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.